ओसरगाव तलाव परिसरातील उद्यानाला ‘कै. बाबी नालंग’ यांचे नाव द्या!
उद्यानात अर्धाकृती पुतळा उभारण्याची सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांची मागणी; ग्रामस्थांचाही पुढाकार
ओसरगाव :
दशावतारी कलेतील ज्येष्ठ कलाकार, राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते आणि ओसरगावचे सुपुत्र कै. शिवराम जयराम नालंग उर्फ सर्वांचे लाडके ‘बाबी नालंग’ यांची कायमस्वरूपी स्मृती जपण्यासाठी ओसरगाव तलाव परिसरात विकसित होत असलेल्या उद्यानाला त्यांचे नाव देण्यात यावे, तसेच उद्यानाच्या परिसरात त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ओसरगावचे माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी केली आहे.
ओसरगाव तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कै. बाबी नालंग यांच्या कार्याची आणि दशावतारी कलेतील योगदानाची कायमस्वरूपी आठवण जपण्यासाठी उद्यानाला त्यांचे नाव देऊन अर्धाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी ग्रामस्थांचीही इच्छा आहे.
कै. बाबी नालंग यांनी आपल्या अभिनयकौशल्याने दशावतारी कलेला मोठे योगदान दिले. त्यांच्या कलेचा आणि कार्याचा सन्मान व्हावा, तसेच भावी पिढ्यांनाही त्यांच्या योगदानाची ओळख व्हावी, या उद्देशाने ही मागणी करण्यात येत आहे.
यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने लवकरच लेखी निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती बबली राणे यांनी दिली.
ओसरगावच्या या सुपुत्राच्या स्मृती जपण्यासाठी उद्यानाला त्यांचे नाव आणि अर्धाकृती पुतळा उभारून त्यांच्या कलासेवेचा यथोचित सन्मान करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
