You are currently viewing कुडाळमध्ये १९ ऑक्टोबरला दुर्गामाता दौड
Oplus_16908288

कुडाळमध्ये १९ ऑक्टोबरला दुर्गामाता दौड

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा व विचारांचा जागर; १६ कर्तबगार महिलांचा होणार सन्मान

महिलांसह पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन

कुडाळ : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि संभाजी भिडे गुरूजी यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवानिमित्त कुडाळ येथे सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये भक्ती, शक्ती, सुसंस्कार आणि धर्मजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दुर्गामाता दौड ही केवळ धावण्याची दौड नसून, तरुण पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची शौर्यगाथा आणि विचारांची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. या दौडीत महिलांसह पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कुडाळ येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत या दौडीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी उन्मेषा दाभोळकर, पद्मा वेंगुर्लेकर, श्रेता बेलेकर-सावंत, भावना वेळकर, बंड्या सावंत, श्रीकृष्ण शिरोडकर, रमाकांत नाईक, विवेक पंडित, शिवम म्हाडेश्वर, आनंद वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

सोमवारी सकाळी ८ वाजता आई केळबाई मंदिर येथून दुर्गामाता दौडीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर कुडाळ बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज नगरमार्गे जिजामाता चौक येथे दौडीचा समारोप होणार आहे. या वेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १६ कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या दौडीदरम्यान कणकवली-बिडवाडी येथील महिलांचे लाठीकाठी, तलवारबाजी तसेच दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक कार्यक्रम सादर होणार आहेत. याशिवाय विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

या उपक्रमात महिलांसह पुरुषांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन दुर्गामाता दौड यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा