You are currently viewing दुर्मिळ ‘बी निगेटिव्ह’ रक्तगटासाठी संजय ठक्कर यांचे तत्पर रक्तदान!

दुर्मिळ ‘बी निगेटिव्ह’ रक्तगटासाठी संजय ठक्कर यांचे तत्पर रक्तदान!

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सदस्याचे माणुसकीचे दर्शन; ठक्कर यांचे १० वे रक्तदान

कुडाळ : प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेला दुर्मिळ अशा ‘बी निगेटिव्ह’ रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता भासली असता,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य आणि नियमित रक्तदाते संजय ठक्कर (कुडाळ) यांनी तत्परता दाखवत रक्तदान केले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे गरजू रुग्णाला मदतीचा मोलाचा हात मिळाला आहे.

दि १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सोनाली गोरली (कुडाळ) यांना प्रसूतीसाठी महिला व बाल रुग्णालय,कुडाळ येथे दाखल करण्यात आले होते.यावेळी त्यांच्यासाठी दुर्मिळ ‘बी निगेटिव्ह’ रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता होती.अशा वेळी रक्ताची गरज लक्षात घेऊन संजय ठक्कर यांनी तातडीने पुढाकार घेत जिल्हा रुग्णालय रक्तपेढी,सिंधुदुर्ग येथे रक्तदान केले.

विशेष म्हणजे,संजय ठक्कर यांचे हे १० वे रक्तदान असून, यापूर्वीही त्यांनी गरजू रुग्णांसाठी तत्परतेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.दुर्मिळ रक्तगटाचे रक्त मिळणे अनेकदा आव्हानात्मक ठरते.अशा परिस्थितीत वेळेवर रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचे योगदान रुग्णासाठी अत्यंत मोलाचे ठरते.

या रक्तदानासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन गुंड यांच्यासह अन्य संबंधितांनी प्रयत्न केले.

संकटाच्या प्रसंगी धावून जाणे, गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे आणि रक्तदानातून माणुसकी जपणे,हीच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानची सामाजिक कार्याची परंपरा आहे.संजय ठक्कर यांनी दाखविलेल्या या तत्परतेबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून,त्यांच्या कार्याला ‘सिंधुसलाम!’ देत प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

रक्तदान हेच जीवनदान! एका रक्तदात्याच्या पुढाकारातून एखाद्या कुटुंबाला मोठा आधार मिळू शकतो,याचेच हे प्रेरणादायी उदाहरण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा