सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिके मार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत सांगली भुयारी गटार योजना टप्पा क्र. २, भाग क्र. २ ही एकूण ₹८२.२२ कोटी खर्चाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची कामे अंतिम टप्प्यात असून, विविध भागांतील सार्वजनिक मलनिःसारण वाहिन्या टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
९० किलोमीटरपैकी ८९.४२ किलोमीटर मलनिःसारण वाहिन्यांचे काम पूर्ण
या योजनेअंतर्गत सुमारे ९० किलोमीटर लांबीच्या मलनिःसारण वाहिन्या टाकण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ८९.४२ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, योजनेअंतर्गत २३.५ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) सन २०१८ पासून कार्यान्वित आहे.
या योजनेमध्ये कोल्हापूर रोड पंपिंग स्टेशन, पदमाळे रोड पंपिंग स्टेशन आणि अंकली पंपिंग स्टेशन अशा एकूण तीन पंपिंग स्टेशनचा समावेश आहे. यापैकी अंकली पंपिंग स्टेशनदेखील सुरू करण्यात आले असून, उर्वरित कामे पूर्ण करून संपूर्ण यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.
सांगलीतील विविध परिसरांमध्ये मलनिःसारण वाहिन्या कार्यान्वित करण्याचे काम सुरू
योजनेअंतर्गत महानगरपालिका हद्दीतील विविध भागांमध्ये सार्वजनिक मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे विकसित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत खालील परिसरांतील मलनिःसारण वाहिन्या कार्यान्वित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
प्रगती कॉलनी, कुंटे मळा, नागराज कॉलनी, पार्श्वनाथ कॉलनी व लगतचा परिसर, हनुमान नगर, आप्पासाहेब पाटील नगर, रामकृष्ण परमहंस सोसायटी लक्ष्मीनारायण कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी व लगतचा परिसर, सावरकर कॉलनी, दत्तनगर व इतर परिसर.
या परिसरांतील मलनिःसारण वाहिन्या कार्यान्वित झाल्यानंतर सांडपाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे.
सांडपाण्याची समस्या कमी होऊन स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याला चालना
भुयारी गटार योजनेमुळे उघड्यावर वाहणारे सांडपाणी, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये घट होण्यास मदत होणार आहे. परिणामी, परिसरातील स्वच्छता सुधारणे, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे शक्य होणार आहे.
सदर योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर अंदाजे १ लाख नागरिकांना थेट लाभ होणार असून, सुमारे ३० हजार मलनिःसारण जोडण्या अपेक्षित आहेत. या प्रकल्पामुळे शहरातील मलनिःसारण व्यवस्थेला अधिक बळकटी मिळून स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी शहराच्या निर्मितीस चालना मिळणार आहे.
नागरिकांनी मलनिःसारण जोडणीसाठी जलनिःसारण विभागाशी संपर्क साधावा
ज्या परिसरांमध्ये सार्वजनिक मलनिःसारण वाहिन्या कार्यान्वित करण्यात येत आहेत, त्या भागातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या नियमानुसार आपल्या मालमत्तेची मलनिःसारण जोडणी करून घ्यावी. यासाठी महानगरपालिकेच्या जलनिःसारण विभागाशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
नागरिकांच्या सहकार्यामुळे भुयारी गटार योजनेचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यास आणि शहरातील स्वच्छता व आरोग्यविषयक सुविधांमध्ये सुधारणा करण्यास मदत होणार आहे.
