You are currently viewing नवरात्र….सहावा दिवस… सहावा दिवा..सहावी माळ
Oplus_16908288

नवरात्र….सहावा दिवस… सहावा दिवा..सहावी माळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*नवरात्र….सहावा दिवस… सहावा दिवा..सहावी माळ……* 

 

 

*”सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके* ।

*शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते* ॥ ”

 

आज नवरात्रीचा सहावा दिवस…आज आपण अशा एका संत स्त्रीचा परिचय करून घेणार आहोत,जी अभिमानास पात्र आहे. पण तिच्या विषयी माहिती बघितली तर आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही आपण…..तर या थोर संत विभूतीचे नाव आहे….

 

*संत बहिणाबाई…..संत तुकाराम महाराजांच्या शिष्या.*

 

संत बहिणाबाई (पाठक) या वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध स्त्री संत आणि कवयित्री होत्या.

इथे सुरुवातीला खुलासा करते की संत बहिणाबाई आणि खान्देशी कवयित्री बहिणाबाई चौधरी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. येथे संत बहिणाबाईंची माहिती आपण घेणार आहोत. इथे एक गोष्ट सांगायला हवी,की आता पर्यंत आपण ज्या स्त्री संतांचा परिचय करून घेतला,त्या अत्यंत सामान्य कुटुंबातील होत्या.संत बहिणाबाई पाठक या ब्राह्मण कुटुंबातील होत्या.

 

संत बहिणाबाई यांचा जन्म: इ.स. १६२८ (शके १५५१), देवगाव इथे झाला.

त्यांचे आई-वडील म्हणजे जानकी व आउजी कुलकर्णी. आणि पती रत्नाकर ऊर्फ गंगाधर पाठक. म्हणून या संत बहिणाबाई रत्नाकर पाठक.

बहिणाबाई यांचे वयाच्या पाचव्या वर्षी लग्न लागले होते. पण ईश्वर भक्तीत रममाण असलेल्या बहिणाबाई संसारात फारशा रमल्याच नाहीत. बहिणाबाईंनी पती व माहेरच्या माणसांसोबत अनेक तीर्थयात्रा केल्या. संत बहिणाबाईना लहानपणा पासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्‍पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण तिची संसारावरील आसक्‍ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. एकदा वडगावकरांच्या कीर्तनात तुकारामांचे अभंग ऐकून त्या तुकामय झाल्या. तुकाराम यांच्यावर त्यांची भक्ती बसली.

 

घरची गरिबी, शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाच्या रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडे. पुढे कोल्‍हापूरच्या वास्‍तव्‍यात जयराम स्‍वामीच्‍या कथा कीर्तनाचा संत बहिणाबाईच्‍या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकारामाचे अभंग म्‍हणू लागली व तिने तुकारामाच्या दर्शनाचा ध्‍यास घेतला. तिला तुकोबारायांना सदगुरू करून त्‍यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्‍यावयाचा होता. म्‍हणून रात्रंदिवस तुकोबांचे अभंग म्हणत ती त्‍यांचे ध्‍यान करू लागली. परंतु भेटीपूर्वीच तुकोबारायांचे वैकुंठागमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. शेवटी तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून, तुकोबारायांनी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी स्‍वप्‍नात येऊन तिला साक्षात दर्शन व गुरुपदेश दिला आणि त्यांचे शिष्यत्व स्वीकारले.

 

तथापि एका ब्राम्हण स्त्रीने तुकारामांचे शिष्य व्हावे, ही गोष्ट सनातन्यांना पटणारी नव्हती. त्यांनी त्यांचा खूप छळ केला , पण त्यांनी आपली तुकाभक्ती सोडली नाही. बहिणा आपल्या गुरूंचा उल्लेख पदोपदी आपल्या अभंगात करीत. बहिणा म्हणते,

 

‘तुका सद्गुरू सदोहर l

भेटतो अपार सुख होव ll

तुकारामा भेटला धन्य

जिने माझे कृत्यकृत्य झाले सहजाचि ‘

 

बहिणाबाईचे सारे जीवन गुरूबोधामुळे बदलून गेले. तिने आपले गुरू संत तुकाराम महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे. तुकाराम महाराजांविषयीं प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत, त्यामुळे या अभंगांना विशेष महत्त्व आहे.

 

अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी मिळून ७३२ कविता त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या या कविता भक्तिभावाचा उत्स्फूर्त अविष्कार आहे. वेदान्ताचे प्रतिपादनही त्यात आढळते. त्यांच्या अभंगांतून तुकारामांच्या चारित्र्याचे अस्सल दर्शन घडते. बहिणाबाईंनी आपल्या अभंगातून ‘ब्राम्हण कोण’ हा विषय उपस्थित करून ब्राम्हण आणि ब्राम्हणी सनातनी वृत्तीवर सहज भाष्य केले आहे.त्यांची काव्यशैली साधी सरळ आणि हृदयस्पर्शी आहे.

त्यांनी आपल्या आत्मचरित्रात आणि अभंगांतून आध्यात्मिक अनुभव मांडले आहेत.प्रस्तुत अभंग आपल्या परिचयाचा आहे…..

 

“संत कृपा झाली। इमारत फळा आली।

ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।।

नामा तयाचा किंकर। तेणे विस्तरिले आवार।

जनी जनार्दन एकनाथ। स्तंभ दिला भागवत।

तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।

बहिणा फडकती ध्वजा। तेणे रूप केले ओजा॥”

 

(ओजा’ म्हणजे उजळ, तेजस्वी किंवा स्पष्ट करणे. म्हणजेच, या सर्व संतांच्या कार्याचे वर्णन करून, त्यांच्या विचारांचे स्पष्टीकरण व निरूपण करून मी या भक्तीच्यारूपाला (म्हणजेच वारकरी धर्माला) अधिक तेजस्वी, प्रगट आणि उजळ केले आहे। )

 

हा वारकरी संप्रदायाचा वारसा सांगणारा प्रसिद्ध अभंग संत बहिणाबाई यांनीच लिहिला आहे.

 

हा अभंग वाचून संत, संतचरित्रकार आणि ‘श्री गजानन विजय’कर्ते संतकवी दासगणू महाराज लिहितात, “पहा केवढा अधिकार .. ऋणी तिचा परमेश्वर …”.

 

संत बहिणाबाई यांचे पुढील काही अभंग आपल्या समोर नमुन्यासाठी देते….

 

न बोलवे शब्द अंतरींचा धावा ।

नायके तुकोबा काय कीजे ॥ १ ॥

अदृष्ट करंटें साह्य न हो देव ।

अंतरींची हांव काय करूं ॥ २ ॥

तेरा दिवस ज्यानें वह्या उदकांत ।

घालोनियां सत्य वाचविल्या ॥ ३ ॥

 

या अभंगात त्यांनी संत तुकाराम महाराजांचे महात्म्य आणि त्यांच्या वह्या (गाथा) इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर घडलेल्या चमत्काराचे वर्णन केले आहे.

 

 

संचितासी दग्ध करी ऐसा कोण ।

सद्‌गुरुवांचोन जाण मना ॥ १ ॥

यालागीं सद्‌गुरु असावा उत्तम ।

जेणें निमे श्रम संसाराचा ॥ २ ॥

त्रिविध तापासी कोण करी शांत ।

सद्‌गुरु एकान्त न जोडतां ॥ ३ ॥

 

यामध्ये त्यांनी सद्गुरूंचे महत्त्व आणि त्यांच्या कृपेचे वर्णन केले आहे

• पूर्वजन्माचे किंवा मागील कर्मांचे संचित (साचलेले पाप-पुण्य व त्याचे भोग) जाळून नष्ट करणारा सद्गुरूशिवाय दुसरा कोण आहे? कुणीही नाही.

म्हणूनच आपला सद्गुरू हा अतिशय श्रेष्ठ (उत्तम) असावा, ज्याच्या कृपेने या संसारातील सर्व श्रम, दुःख आणि चोरासारखे सतावणाऱ्या फेऱ्या नष्ट होतात.

अध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा त्रिविध तापांना (दुःखांना) सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्याशिवाय किंवा त्यांची कृपा प्राप्त झाल्याशिवाय कोण शांत करू शकेल?

 

वत्साचिये माय कपिला सांगातें ।

धांवे एकचित्तें आम्हांपुढें ॥ १ ॥

मायबाप बंधु भ्रतारासहित ।

इंद्रायणी जेथ तेथें आलों ॥ २ ॥

करोनीया स्नान पांडुरंगभेटी ।

आनंदली सृष्टी अंतरंगें ॥ ३ ॥

 

इथे जेव्हा बहिणाबाई आपल्या कुटुंबासह संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देहू येथे आल्या, त्यावेळच्या त्यांच्या भावस्थितीचे आणि प्रवासाचे वर्णन या अभंगात आले आहे।

 

“घट फुटलियावरी नभ। नभाचे भीतरी ॥१॥

ऐसा देह गेलियाने। उरे स्वरूप चिद्धन ॥२॥

जळ आटलिया जाण । प्रतिबिंब म्हणे कोण ॥३॥

लागली कापुरासी । अग्निरूप नाही म्हैसी ॥४॥

 

या महत्वपूर्ण अभंगाचा अर्थ आणि भावार्थ असा आहे, की

 

” ज्याप्रमाणे मातीचा घट (घडा) फुटल्यानंतर त्या घटातील आकाश बाहेरच्या विशाल आकाशात विलीन होते, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर नश्वर शरीर नष्ट होते आणि आत्मा किंवा चैतन्य मूळ ब्रह्मांडाशी एकरूप होते.

शरीर गेल्यावर केवळ शाश्वत असे ‘चिद्धन’ (चैतन्यस्वरूप ब्रह्म) उरते.

पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब पाणी आटल्यावर कुठे जाते? तसेच देहरूपी जळ आटल्यावर मूळ तत्त्व शिल्लक राहते.

कापूर जळाल्यावर जसा तो पूर्णपणे अग्नीशी एकरूप होतो, त्यात वेगळेपण उरत नाही, तसेच साधकाचे स्वरूप होते.

 

 

किती कमाल आहे हा अभंग….त्याकाळी एक अशिक्षित स्त्री किती उच्च कोटीचा विचार करत होती, हे पाहून थक्क व्हायला होते.

 

‘घट फुटलियावरी। नभ नभाचे अंतरी॥’ त्यांचा

हा शेवटचा अभंग सांगितल्यावर त्या समाधिस्थ झाल्या….

 

संत बहिणाबाईंनी २ ऑक्टोबर १७०० रोजी हा अभंग सांगून शिऊर या गावी समाधी घेतली होती.

 

संत बहिणाबाई यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा…

 

……………….,……………………………………..

© *पल्लवी उमेश*

(कॉपी राईट आहे)

“चिन्मय”,शाहूनगर,

जयसिंगपूर

मोबा.9823735570

प्रतिक्रिया व्यक्त करा