You are currently viewing जलसंधारणासाठी वन विभागाचा पुढाकार,

जलसंधारणासाठी वन विभागाचा पुढाकार,

जलसंधारणासाठी वन विभागाचा पुढाकार,

खानापूर तालुक्यात श्रमदानातून 28 वनराई बंधारे पूर्ण : २२५ वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट

सांगली: प्रदीप जोशी,

ज्येष्ठ पत्रकार दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला असून, या माध्यमातून खानापूर तालुक्यात श्रमदानातून 28 वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. वनक्षेत्रामधील नैसर्गिक पाणीस्त्रोतांवर सुमारे २२५ वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती खानापूर-विटा वनक्षेत्रपाल विलास पवळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या निर्देशानुसार, उपवनसंरक्षक (प्रा.) सागर गवते व सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, खानापूर तालुक्यात भूजल पातळीत झालेली घट, जलस्रोतांमधील अपुरा पाणीसाठा, सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान, मातीतील ओलाव्याचे घटते प्रमाण आणि भूजल पुनर्भरण क्षमतेत झालेली घट आदि कारणांमुळे संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करून संभाव्य पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार, खानापूर तालुक्यातील वनक्षेत्रात साखळी पद्धतीने ठराविक अंतरावर वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत.

खानापूर तालुक्यात वन विभागाच्या माध्यमातुन वनक्षेत्रामध्ये असलेल्या नैसर्गिक पाणीस्त्रोतांचा समावेश करुन, वनपाल, वनरक्षक, वनमजुर तसेच शालेय विद्यार्थी व लोकसहभाग घेऊन त्यांच्याकडून श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. वनराई बंधारे हे खानापुर तालुक्यातील सुळेवाडी, पारे, घोटी बु., खंबाळे, भिकवडी बु, वाळुज, रेवणगांव, वासुंबे, धोंडगेवाडी, मादळमुठी, देविखिंडी, लेंगरे, जाधववाडी, करंजे, पोसेवाडी, घोटी खुर्द, ऐनवाडी, मेंगाणवाडी, हिवरे, ताडाचीवाडी व बाणूरगड येथील वनक्षेत्रामधील नैसर्गिक पाणीस्त्रोतांवर सुमारे २२५ वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. आज अखेर २८ वनराई बंधारे श्रमदानातून पूर्ण करण्यात आले आहेत.
बदलत्या हवामानामुळे पावसाचे अनियमित प्रमाण, भूजल पातळीत घट आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाई यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे आणि मातीची धूप कमी करण्याच्या उद्देशाने वनराई बंधारे उभारण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे जलसंधारणाबाबत जनजागृती होण्याबरोबरच ग्रामस्थांमध्ये श्रमदानाची भावना आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढण्यास मदत होत आहे. नागरिकांनी जलसंधारणाच्या या सामूहिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा