You are currently viewing नवरात्र…दिवस तिसरा…तिसरी माळ
Oplus_16908288

नवरात्र…दिवस तिसरा…तिसरी माळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*नवरात्र…दिवस तिसरा…तिसरी माळ* ..

 

**या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता* ।

*नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः* ॥

*

*आज नवरात्रीचा तिसरा दिवस* …आज आपण अशा एका संत स्त्रीचा परिचय करून घेणार आहोत,जी अभिमानास पात्र आहे. तिचे नाव आहे….

 

*संत सोयराबाई….संत चोखामेळांची पत्नी*

 

सोयराबाई म्हणजे संतश्रेष्ठ चोखामेळा यांची पत्नी व शिष्या!

पंढरपूरच्या जवळचे एक गाव मंगळवेढा. तेथे संत चोखामेळ्यान्चे वास्तव्य होते. हा अभंग दिसतो तेव्हढा साधा नाही. चोखामेळा व सोयराबाई हे दलित समाजातील होते. तत्कालीन सामाजिक स्थितीत त्यांना काय भोगावे लागले असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. त्यातून चोखामेळ्याचे आयुष्य पंढरीनाथांची भक्ती करण्यात व अभंग लिहिण्यात गेले- म्हणजे त्यांची विठ्ठलभक्ती न समजणाऱ्या/जाणणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टीने निरर्थक कामात वाया गेलेले, असे होते.

 

संत सोयराबाई या १४व्या शतकातील मराठी कवयित्री आहेत. घरामध्येच विठ्ठल भक्तीचे वारे प्रथम पासूनच होते…त्यात सोयराबाई देखील विठ्ठल भक्त..त्यामुळे सतत कानावर चोखोबांचे अभंग पडत असत…

सोयराबाईंनी यांनी देखील बरेच अभंग लिहिले पण त्यातील केवळ ९२ उपलब्ध आहेत. तिच्या अभंगांमध्ये अत्यंत साधेपणा, सहज पणा आणि रसाळता ओतप्रोत भरलेला दिसून येतो. अभंगांमध्ये ती स्वतःला चोखोबाची महारी म्हणते. चोखोबाची बायको असे अभिमानाने म्हणवून घेत असली, तरी तिने स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. अत्यंत साधी, सोपी आणि रसाळ भाषा हे सोयराबाईंच्या अभंगांचे वैशिष्ट्य होय. सोयराबाईचा काळ समाजाच्या दृष्टीने कर्मठ काळ होता..समाजात जाती, पाती चे प्रस्थ,कर्मकांड प्रस्थ अतोनात होते. अशात स्त्रीच्या विटाळ हा अपवित्र मानला जात असे…या काळात चार दिवस स्त्रीला अत्यंत हलाखीचे असताना,स्वच्छतेच्या कोणत्या ही सोयींपासून लांब ठेवण्यात येई…त्यात त्याकाळी स्पृश्य अस्पृश्य ,

वर्णभेद असतांना, संत सोयराबाई बंड करून उठतात व देवाशी वाद घालतात .खरतर त्याकाळी ही खूपच धाडसाची गोष्ट होती.एका महार जातीतील स्त्री सोयराबाई देवाला विचारतात, देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?,

सोयराबाईंना असा विश्वास होता की “केवळ शरीर अपवित्र किंवा प्रदूषित असू शकते परंतु आत्मा कधीही अशुद्ध नसतो. ज्ञानार्जन हे शुद्धच असते. ”

त्या आपल्या अभंगात म्हणतात……

 

“देहासी विटाळ म्हणती सकळ |

आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ||

देहीचा विटाळ देहीच जन्मला |

सोवळा तो झाला कवण धर्म ||”

 

त्यांचा हा अभंग पुढे विटाळाचे अभंग म्हणून अजरामर झाला… या अभंगांनी जातपातीचा

विटाळ मानणा-यांची थोबाडं चांगलीच रंगवली.

त्यांनी समाजातील व त्याकाळच्या अस्पृश्यता व विटाळाच्या रुढींवर आपल्या ‘विटाळाच्या अभंगां’मधून प्रखर भाष्य केले आहे.

 

पुढे त्या म्हणतात…..

 

“विटाळ वांचोनी उत्पत्तेचे स्थान।

कोणा देह निर्माण नाही जगी।।

म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी।

विटाळ देहांतरी वसतसे।।

देहाचा विटाळ देहीच निर्धारी।

म्हणतसे महारी चोखियाची।।”

 

असा थोर विचार त्याकाळी म्हणजे १४व्या शतकात सोयराबाईनं आपल्या अभंगातून शिकवला.

अगदी चोखोबांच्या मृत्यूनंतरही न डगमगता सोयराबाईंनी. चोखोबांचे मानवता, समता, न्याय, बंधुतेचे विचार आपल्या अभंगांतून बहुजन समाजापर्यंत पोहचवले

 

सुंदर शब्द,उत्तम कर्म आणि निरलस भक्ती यांची अत्युच्च पातळी गाठणाऱ्या संत सोयराबाई, एक श्रेष्ठ संत, पांडुरंग भक्त आणि संत चोखामेळ्यान्च्या पत्नी व शिष्या होत्या. महार समाजात जन्माला आलेल्या संत सोयराबाई आणि त्यांचे यजमान म्हणजेच संत चोखामेळा यांना अनेक यातना, उपेक्षा आणि प्रसंगी प्रतारणा देखील भोगाव्या लागल्या. हाल सोसून विठ्ठलाच्या भक्तीत एकनिष्ठ राहणे किती अवघड झाले असेल!

 

संत सोयराबाईंचा पुढील अभंग तर अजरामर झालाय….विठ्ठल भक्तीत त्या इतक्या रममाण झाल्या की,..अभंग रचला गेला…

 

“अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥”

 

या अभंगात संत सोयराबाईंनी त्यांचे अंतर्मनातले विचार प्रकट केलेले आहेत. अवघा म्हणजे मजजवळ असलेले सर्व काही. माझा सर्व रंग, म्हणजे माझे अस्तित्वच, परमेश्वराशी एकरूप झाले ,म्हणजे या रंगांत श्रीरंग म्हणजेच परमेश्वराचा निवास झालेला आहे!

संत सोयराबाई जणू स्वतःला आणि जमलेल्या/ऐकणाऱ्या सगळ्यांना उद्देशून म्हणत आहेत, की हा संपूर्ण विठ्ठलभक्तीचा परिसर! चंद्रभागेच्या वाळवंटात सर्व भेदाभेद विसरून, सर्व वारकरी एक होऊन त्याच्यामध्ये आता फक्त एकच तत्त्व उरलेले आहे ते म्हणजे श्रीरंग म्हणजे विष्णू किंवा विठ्ठल याची निरपेक्ष भक्ती!

 

“मी तूंपण गेले वायां । पाहतां पंढरीचा राया ॥”

 

मी तूंपण म्हणजे भेदाभेद, द्वैत. खरे तर सर्व वारकरी हे विष्णुभक्त आणि अद्वैत सिद्धांताचे पुरस्कर्ते होते. महाराष्ट्रात एव्हढे प्रगत आणि इतके प्रगल्भ विचार इतक्या शतकांपासून चालत असून सुद्धा आपल्या मनातून अजून जातीव्यवस्था नाहीशी होत नाही, हे आपले दुर्दैवच! अद्वैत सिद्धांतानुसार संपूर्ण चराचर सृष्टीचा गाभा, तो दिव्यात्मा एकच आहे आणि तोच ईश्वर आहे. त्याचाच जर अंश आपल्या सर्वांत आहे, तर यात मी आणि तू या भेदाचे अस्तित्व कसे असू शकेल? हा भेदाभेदविचार संपला, वाया गेला असे संत सोयराबाई ठामपणे म्हणतात. आणि हे सर्व कधी होते? विठ्ठलाच्या सान्निध्यात, त्याचे शांत रूप “पाहतां पंढरीचा राया” सर्व द्वैत संपून अद्वैतात आपण सर्व शिरतो!

पांडुरंगाला पाहिल्यावर ही अशी मनाची अवस्था होणं हे स्वाभाविकच आहे. पण मला वाटते कि संत सोयराबाईंचे शब्दांना वेदनेची झालर आहे. त्या अपार भक्तीच्या भावनेमागे अनेक दुःख आणि यातना दडलेल्या आहेत. जातीने महार असल्यामुळे त्या काळी संत सोयराबाई आणि संत चोखामेळा यांना पंढरपूरच्या मंदिरात प्रवेशच निषिद्ध होता! कल्पना करा, ज्याचे तुम्ही भक्त आहात, ज्याला बघण्याची आस दिवसरात्र लावून ठेवलेली आहे त्याचे दर्शन घ्यायची परवानगी तुम्हाला नाही! वारकरी संप्रदायात एव्हढे मोठे स्थान असूनही हे दोघे बहिष्कृतच!!

आता “पाहतां पंढरीचा राया” या शब्दांमागील आर्तता व करुणा तुमच्या लक्षात येईल. हे दुःख , हीच कैफियत संत चोखामेळा यांनी देखील

 

“उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन”

या शब्दांत मांडलेले आहे! आता तुमच्या लक्षात येईल की फक्त दर्शनाने संत सोयराबाईंच्या मनाची ही अवस्था कशी झाली असेल. असीम वेदनेने ओतप्रोत भरलेले हे शब्द!

“नाही भेदाचें तें काम । पळोनि गेले क्रोध काम ॥”

 

वारकरी संप्रदाय आणि आपली संत मंडळी अद्वैतात विश्वास ठेवणारे असल्याने, सगळ्यात एकाच दिव्य आत्मा अंशरूपात असला तर यात भेदाभेद कसा आला? हे संत सोयराबाई सांगतात.

त्यामुळे भेदाभेदाची ही भावना संपुष्टात आली व क्रोध आणि काम पळून गेले, नाहीसे झाले. क्रोध म्हणजे राग आणि काम म्हणजे वासना, हव्यास, आसक्ती, इच्छा, आकांक्षा. एखादी गोष्ट आपल्याला हवी(च) ही भावना.

 

“देही असोनि विदेही । सदा समाधिस्त पाही ॥”

 

ही ओळ म्हणजे परमेश्वराचे मोठेपणच. देही असोनि विदेही म्हणजे देहात असूनही देहाच्या अस्तित्वाची जाणीवच नसणे. थोडक्यात देहात राहूनही देहातून मुक्ती होऊन निर्विकार-निर्गुण अशी अवस्था प्राप्त होणे. हे म्हणजे निःशंक परमेश्वराच्याच भक्तीचेच वर्णन. संत सोयराबाई त्या ईश्वराला सदा समाधिस्त बघत आहेत. म्हणजे भक्त ईश्वराच्या भक्तीत तल्लीन होऊन देहात (चर सृष्टीत) असूनही विदेही अवस्था प्राप्त करतो आणि जिवंतपणी समाधीस्थ होऊन मुमुक्षु होऊन जातो!

 

“पाहता पाहणें गेले दूरी । म्हणे चोखियाची महारी ॥”

 

आपल्या ईष्टदेवतेचे, पांडुरंगाचे दर्शन न घडल्यामुळे झालेली संत सोयराबाईंच्या मनाची अवस्था आहे. एकदा परमेश्वराचे रूप पाहिले की जगात आणखीन बघण्यासारखे काय उरते? संत चोखामेळा आणि संत सोयराबाई अनेकदा पंढरपूरला गेले असतील. दोघांवर संत नामदेव यांचा खूप स्नेह होता. पंढरपूरला जाऊन केवळ जन्माच्या परिस्थितीमुळे पांडुरंगाचे दर्शन नाही! असे कैक वेळा घडले असणार आहे.

जे रूप बघण्याची आस होती, ते न पाहिल्यामुळे इतर जगात काय बघायचे? उरलेले नाही म्हणजेच “पाहता पाहणें गेले दूरी” ते जे काही पाहणे राहिलेले होते ते आता आणखी दूरच राहिले: म्हणे चोखियाची महारी. पतिव्रता संत सोयराबाई स्वतःला संत चोखामेळा यांची महारी ( महार वरून महारी ) म्हणत असत. एवढा सुंदर भाव व्यक्त केला आहे, एका अशिक्षित, समाजाच्या उपेक्षित अस्पृश्य अशा घटकामधल्या एका साध्यासुध्या गृहिणीने!

 

प्रणाम संत श्रेष्ठ अशा सोयराबाईंना….🙏

…………………………………………………………

 

 

© *पल्लवी उमेश*

(कॉपी राईट आहे)

“चिन्मय”,शाहूनगर,

जयसिंगपूर

मोबा.9823735570

प्रतिक्रिया व्यक्त करा