You are currently viewing संध्याछाया नि पहाट होता

संध्याछाया नि पहाट होता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा अंबाई समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संध्याछाया नि पहाट होता*

लवंगलता

८+८+८+४

 

०००००००००००००००००

दूरवर निळे नभ सुंदरसे निळाईत मी हरवे

जणू कापुसच विखुरला वरी रंगसंगती फुलवे

जणू पैठणी काठावरती भरत काम ते वरते

क्षितिजाशी ती आभाळाची कुजबुज कानी पडते

 

अथांग पाणी जिकडे तिकडे हा देशाचा जलनिधि

शांत वाटते सारे आता साद घालतो जलधी

तरंग उठती लाटा येती किनाऱ्यावरी फुटती

शुभ्र फेन तो उधळी मोती दृश्य मनोरम भवती

 

शांत किनारी उभा तरूवर समाधिस्थ तो वाटे

दृष्य मनोहर पहात असता मनात शांती दाटे

संथच लाटा त्यावरती त्या लहान नावा दिसती

हळूहळू ते किरण नभीचे मंदमंदसे होती

 

पहा पाखरे परतुन जाती झाडावरती वसती

दिसे चांदणे शोभे सुंदर आकाशीच्या ताटी

चांदोबाही मग आकाशी तो डोकावे वाटे

लपंडाव तो चाले वरती शोधायाचे कोठे

 

लिंबोणीच्या झाडामागे ढगाआड तो जाई

शोधशोधती दमून जाती नीज अनावर होई

थकून जाती मग ते बसती तरुवरती त्या सारे

आता जाती झोपायाला मंदच दिसती तारे

 

विद्या रानडे

प्रतिक्रिया व्यक्त करा