You are currently viewing नवरात्रीचा दुसरा दिवस…दुसरा दिवा..दुसरी माळ…
Oplus_16908288

नवरात्रीचा दुसरा दिवस…दुसरा दिवा..दुसरी माळ…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*नवरात्रीचा दुसरा दिवस…दुसरा दिवा..दुसरी माळ…* 

 

*” *या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता* ।

*नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ “**

 

आज आपण वारकरी संप्रदाय मधील अत्यंत महत्वपूर्ण अशा व्यक्तीचा परिचय घेणार आहोत.

 

*संत जनाबाई….संत नामदेवांच्या शिष्या*

 

 

वारकरी संप्रदायातील एक हळवी पण प्रतिभावंत कवयित्री म्हणून जनाबाईंचे नाव घेत येईल.

यांचे मराठी साहित्यात अत्यंत महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी असे योगदान आहे.

संत जनाबाई या संत नामदेव यांच्या शिष्या. खरंतर जनाबाई या नामदेवांपेक्षा वयाने मोठ्या होत्या.अनेक वर्षे जनाबाई त्यांचे पालन पोषण करत होत्या.

जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला.

जनाबाई यांचे आई वडील महाराष्ट्रातील गंगाखेड येथील दमा आणि करुंड ह्या मातंग समाजाचे होते.

त्याकाळी जातीव्यवस्थेचे बंधन कडक होते.

 

जनाबाईंच्या एका अभंगातील

 

“माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||”

 

या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई यांना जन्मतः च भक्तीचे बाळकडू मिळाले होते. संत कवयित्री म्हणून जनमानसात आज ही लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या आजही गातात असे दिसून आले आहे.

 

“दळिता कांडिता तुज गाईन अनंता”

किंवा

 

“सुंदर माझे जाते गे फिरते गरगर ।

दळण दळिते जनी, उभा राहून श्रीहरी ॥

विठ्ठल दळू लागे, जनी झाली गं मोकळी ।

दळिता दळिता विठ्ठले, झाली पाठची माऊली ॥”

 

विठ्ठलाची निस्सिम भक्त संत जनाबाई………पल्लवी उमेश

 

संत जनाबाई यांची आई वारल्यानंतर त्यांचे वडील जनाबाईंना पंढरपूरला घेऊन गेले. लहानपणापासून जनाबाईंनी पंढरपूर येथे राहणाऱ्या दामाशेट (संत नामदेव यांचे वडील) यांच्या घरात मोलकरीण म्हणून काम केले. जनाबाईंचे मालक दामाशेट आणि त्यांची पत्नी गोणाई हे ही अतिशय धार्मिक होते.

 

या घरातील अत्यंत धार्मिक वातावरणात जनाबाई रमल्या…..काम करत असताना नामदेवांचे अभंग ऐकतच त्या मोठ्या होत होत्या.

सभोवतालच्या धार्मिक वातावरणाच्या प्रभावामुळे आणि जन्मजात प्रवृत्तीमुळे जनाबाई नेहमीच विठ्ठलाच्या निस्सीम भक्त झाल्या होत्या.

 

जनाबाई प्रतिभावान कवयित्रीही होत्या. कोणतेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नसले, तरी त्यांनी अभंग प्रकारातील अनेक उच्च दर्जाचे धार्मिक श्लोक रचलेले दिसून आले..त्यांच्या रचना आज ही आवडीने वाचल्या जातात.

 

“पहिली माझी ओवी गे, पहिला माझा घांस ।

पंढरीच्या विठ्ठलाला, देवो निवासाचा वास ॥”

 

किंवा

 

“धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनिया दोर ॥

ह्रुदय बंदिखाना केला । आंत विठ्ठल कोंडिला ॥”

 

या अभंगात जनीने विठ्ठलाला प्रेमाने आणि भक्तीच्या जोरावर आपल्या हृदयात कोंडून ठेवले आहे.

 

 

जनाबाईंनी सुमारे ३०० ते ३५० अभंगांची रचना केली. त्यांच्या साहित्यात भक्तीपर अभंग, परमार्थ जीवन, संतमहिमा आणि आख्यानांचा समावेश आहे.

जनी चे आणि विठोबाचे नाते अपूर्व असे होते..ती आपल्या अभंगातून त्याची उतराई कशी होऊ म्हणून विचारते….

 

झाडलोट करी जनी ।

केर भरी चक्रपाणी ॥१॥

पाटी घेऊनियां शिरीं ।

नेऊनियां टाकी दुरी ॥२॥

ऐसा भक्तिसी भुलला ।

नीच कामें करुं लागला ॥३॥

जनी ह्मणे विठोबाला ।

काय उतराई होऊं तुला ॥४॥

 

त्यांनी विठ्ठलाला केवळ दैवत मानले नाही, तर त्याला ‘विठाई’ किंवा ‘माय’ (आई) म्हणून संबोधले. विठ्ठलाशी सख्यत्व आणि जिव्हाळ्याचे नाते त्यांनी आपल्या अभंगवाणीतून मांडले.

 

पंढरपुरात संत नामदेवांच्या घरी त्यांनी आयुष्यभर मोलकरीण म्हणून काम केले. जात्यावर दळण दळणे, शेणखत पाडणे यांसारखी कष्टाची कामे करतानाही त्यांनी विठ्ठलबद्ध भक्तीचा मळा फुलवला.

संसारातील आणि दैनंदिन कष्टातील कामांना भक्तीची जोड देत त्यांनी श्रमप्रतिष्ठेचा मोठा संदेश दिला.

गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.

घरची कष्टाची कामे करतानाही विठ्ठल त्यांच्या पाठीशी कसा उभा राहत असे, याचे सुंदर वर्णन या अभंगात आहे.

 

“दळिता कांडिता तुज गाईन अनंता ॥

न विसंबे क्षणभरी । तू रे राहसी माझे अंतरी ॥

जेविता खाविता तुझे नाम वाचे ।

जनी म्हणे विठोबा । सुख दुःखाचे सोयरे ॥”

 

 

संत जनाबाईंचा हा पुढचा सर्वात प्रसिद्ध अभंग आहे. यामध्ये त्यांनी विठ्ठलाला एका माऊलीच्या (आईच्या) रूपात पाहिले आहे, जिच्याभोवती सर्व संतांचा मेळा जमला आहे.

विठ्ठलाची जणु ही सारी लेकरे आहेत,हा भाव आहे…कोण कोण लेकरू आहेत ते या प्रस्तुत अभंगातून दिसून येते..

 

“विठू माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ॥

निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ॥

पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताबाई सुंदर ॥

गोरा कुंभार पाठीवरी । चोखा मेळा बरोबरी ॥

बंका कडोविकडी । सांवता तो मागे हिंडे ॥

जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ॥”

 

संत नामदेवांमुळे त्यांना सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता.

‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्वरू।’

असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हणले आहे. .

 

संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग ‘सकल संत गाथा’ या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यान रचना पण त्यांच्या नावावर आहे.

 

संत जनाबाईंची भावकविता देखील भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली दिसून येते. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ती-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत.

 

धरिला पंढरीचा चोर ।

गळा बांधोनिया दोर ॥ धृ ॥

हृदय बंदीखाना केला ।

आत विठ्ठल कोंडीला ॥१॥

शब्दे केली जडाजुडी ।

विठ्ठल पायी घातली बेरी ॥2॥

सोहं शब्दाचा मारा केला ।

विठ्ठल काकुळती आला ॥ ३ ॥

जनी म्हणे बा विठ्ठला ।

जीवे न सोडी मी तुजला ॥ ४ ॥

 

या वरील अभंगात जनाबाई विठ्ठलाला चोर म्हणून संबोधत आहे.त्याला आपल्या भक्तीच्या दोराने हृदयाच्या बंदीखान्यात (तुरुंगात) कसे कोंडून ठेवले आहे, याचे अतिशय सुंदर व हक्काचे वर्णन केले आहे

 

‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री-विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात.’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात.

 

 

नामदेवांच्या रचनांसह त्यांच्या देखील काही रचना जतन करण्यात आल्या होत्या.

संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील वारकरी पंथातील हिंदूंच्या मनात जनाबाईंना आदराचे स्थान आहे.

“कीर्तनासी जातां मार्गी टाकी पाय ।

अमर देह होय कळे त्यासी ॥”

 

अशा या संत जनाबाईंना आपल्या वारकरी संप्रदायात मानाचे स्थान आहे..आज नवरात्री निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते.🙏

………………………………………………………….

 

———————————————

© *पल्लवी उमेश*

(कॉपी राईट आहे)

“चिन्मय”,शाहूनगर,

जयसिंगपूर

मोबा.9823735570

प्रतिक्रिया व्यक्त करा