You are currently viewing जामनगर

जामनगर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*माझी खाद्य संस्कृती*

(भाग-शेवटचा) 

*जामनगर*

 

छान जमली होती खाद्य संस्कृतीमाला,

शेवटच्या भागाकडे येतांना निश्चितच हा शेवटचा का?

प्रश्न पडला.

सुरुवात आहे तेथे शेवट असणे अनिवार्य आहे.

 

बरीच ठिकाणे मनाभोवती रुंजी घालताहेत, त्यातलंच एक ठिकाण म्हणजे जामनगर.जामनगर हे नावच मुळी जामसाहेब म्हणजे तिथले राजे होते त्यांच्या नावावरून पडले.आणि त्याच नावाची जामनगर टेक्स्टाईल गावातच आहे.

नोकरीच्या अगदी सुरुवातीच्या काळात गेलो होतो तिथं.गुजरात त्यातूनही सौराष्ट्र जवळून अनुभवता आला.

 

मुंबईहून रेल्वेने जायचे ठरवले होते.त्यामुळे अर्थातच नासिक-दादर-बांद्रा टर्मिनस जाणे झाले.असेही राजस्थान, गुजरात जातांना बांद्रा टर्मिनस अनिवार्य आहे.

ह्या मार्गावर साधारणतः अबू स्टेशन पर्यंत कुणी जेवण विचारायला येत नाही, म्हणजे रेल्वे केटरिंग संदर्भात म्हणतोय मी.

कारण काय विचारत आहात?

अहो,गुजराती मंडळी प्रवासाला निघातांनाच घरुन ढोकळा, फाफडा, ठेपले असे बरेच पदार्थ घेऊन निघतात.अर्थात ते सर्व पदार्थ काही त्यांचे घरी केलेले नसतात पण त्यांच्या त्यांच्या स्थानिक दुकानदारां कडून खरीदलेले असतात.

एकदा सामान लावण्याची सोय झाली की लगेचच डबे उघडून प्लेटी भरुन सगळ्यांना (म्हणजे त्यांच्या कुटुंबियानाच बरे !) सर्व्ह केल्या जातात.आणि डब्यांचा खडखडाट आणि तोंडाचा मचमचाट करीत ते सुरु होतात.सोबतीला तारस्वरात गप्पा मारणे चालूच असते.

ही मंडळी चनाडाळीचे इतके विविध प्रकार खातात की काय सांगावे ह्या पामराने?

सहजमनी प्रश्न उपजला समजा, काही कारणाने एखादे वर्षी हरभऱ्याचे देशांतर्गत उत्पादन रोडावले तर ?

तर,बहुदा देशात राष्ट्रीय आपत्ती जाहीर होईल निश्चितच !

 

बरीच वर्षे लोटली आज त्या शहरी जायला आजमितीला, आम्ही जिथे रहात होतो त्या हॉटेलचे नाव नाही आठवत.

असो,पण ते हॉटेल चांगले प्रशस्त आणि शहराच्या मध्यवर्ती भागात होते.

त्याच्या मध्यवर्ती असण्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला होता आम्ही.

म्हणजे बघा, रात्री उशिरापर्यंत फिरणे, फालुदा, आइसक्रीम रात्री अपरात्री खाणे चालायचे.

नेमके एका टी डी त नवरात्र उत्सव आला होता.आम्ही सर्व जण रात्री दीडदोन वाजेपर्यंत फिरायचो दांडिया पहात.

तिथला दांडिया पहाणं एक अदभूत अनुभव आहे.

आपण टिपऱ्या खेळतो आणि त्याला दांडिया म्हणतो.

 

खरा फरक आहे तो हा की, पहायला गेलेल्यानें सहभागी व्हायचे नसते,पाहणाऱ्यांसाठी खुर्च्या मांडलेल्या असतात.आणि नृत्य सादर करणाऱ्या ललना सुंदर पेहरावा सहित असतात.त्या जी मडकी फिरवत फिरवत नाचतात ती मडकी सुद्धा उत्तम प्रकारे रंगवलेली असतात.आणि मुख्य म्हणजे रात्री कितीहि उशीर झाला तरी असुरक्षित बिलकुल वाटत नाही.

 

शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक रणमल तलाव (ज्याला लाखोता तलाव असेही म्हणतात) थोडा उंचावरच आहे.पंप न लावता केवळ ग्राव्हिटीने त्यातून नळाद्वारे पाणी पुरवठा होतो.(ही माहिती तिथल्या स्थानिकांनी दिली होती, चुकभुल देणेघेणे)

हा तलाव पाणी टंचाई निर्माण झाल्यास नर्मदा प्रकल्पातुन भरला जातो.

 

ह्या तलावाच्या काठावर मंदिरं आहेत आणि सकाळी सकाळी त्या मंदिरांत चालणारा रामनाम जप आणि भजन ऐकतांना फारच प्रसन्न वाटते.एक दिवस अचानक ऐरफोर्स गेटवर गेल्यावर त्यांच्या परेड मुळे आम्हाला सुट्टी मिळाली होती,म्हणून ते सर्व अनुभवायला मिळाले,एरव्ही कोण जातंय इतक्या लवकर उठून तिथं.

 

गुजरात म्हणजे ड्राय एरिया,इथं आपल्याला ड्राय डे माहित आहे ना तसाच हा ड्राय एरिया !

एका स्थानिकाने सांगितले,

“बापूने पुरे देश को आजाद किया मगर, गुजरात को नहीं !”

करुण हास्य रसाचं उदाहरण म्हणता येईल असं हे वाक्य.

त्यामुळे झालं काय तर ड्रिंक्स घ्यायचे असेल तर ऐरफोर्स कँटीनला जावे लागे, त्यातूनही ऐरफोर्स एरिया सोडून निघून यावे लॉजवर तर येतांना स्थानिक पोलिसांची भीती.

असो,काही अडले नाही त्यामुळे म्हणा.

 

ह्या टी डी त वेरावळ, जुनागढ, राजकोट, द्वारका, बेट द्वारका बघणे झाले.

 

वेरावळला तर समुद्र किनारी रस्त्यावर मासे वाळवायला टांगलेले पण चौकशी करुनही ते फ्राय वगैरे करून विकणारी हॉटेले सापडली नाही.कदाचित सोमनाथ मंदिर तेथून केवळ तीनचार किलोमीटरवर आहे म्हणूनही असेल.अर्थात हा काळ ऐंशी नव्वदच्या दशकातला.

 

जुनागढ, राजकोट शहरं मोठमोठी पण भव्य मोठ्मोठ्या इमारती वेल मेंटेड पण कुलूपबंद अवस्थेत.

त्यांचे मालक म्हणे व्यापारउदीम करण्यास्तव मुंबई दिल्ली गेलेले.

जुनागढ मुळे गिरनार पर्वती जाणे शक्य झाले.

ऐन दसऱ्याच्या दिवशी दत्त प्रभूंच्या तपश्चर्या स्थानी जाता आले. अहो, भाग्य !

आज सारखे मंदिर वगैरे काही नव्हते तेथे.

दत्त धुनी पासून वर सुळक्यावर एक चौथरा आहे, त्या चौथऱ्यावर बसून दत्त प्रभूंनी साधना केली होती.

त्या चौथऱ्यावर माथा टेकवणे आणि काही काळ तिथे व्यतीत करणे एक अलौकिक अनुभव आहे.

 

ढगांच्यावर आलेला तो सुळका आणि त्या चौथऱ्यावर बसून तो पाहिलेला नजारा.आजही चक्षूं समोर आहे.

दत्त धुनी आणि परिसर जोशी मठाच्या अधिपत्याखाली आहे असे समजले.तसेच दत्त धुनी ही प्रत्यक्ष दत्त प्रभूंनी प्रज्वलित केलेली आहे आणि तेंव्हा पासून ती प्रज्वलितच ठेवली आहे असेही समजले.

दहा हजार पायऱ्या चढून आल्याचं सार्थक झालं ना राव !

 

येथून जवळच समुद्र किनारा आहे म्हणून इथे क्षारयुक्त हवा आहे.मी घाम येतो म्हणून केवळ हाफ पॅन्ट आणि बनियनवर होतो, झालं असं की घाम आणि खारी हवा आणि पुढील दोन दिवस खांद्यांवरुन नुसता हात जरी फिरवला तरी पावडर भुकटी पडावी तस कोरडी कातडी खाली पडायची.

नंतर झालं सर्व काही नॉर्मल.त्रास असा काही झाला नाही.दहा हजार पायऱ्या चढून आणि उतरुनही दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे ऐरफोर्स स्टेशनवर कामाला हजर होतो.

 

रस्त्यावरच अंबा मंदिर आणि एक जैन मंदिर आहे.दोन्हीही बघण्यासारखी.त्यातल्या त्यात दसरा असल्याने अंबा मंदिरात जाणाऱ्यांची संख्या जास्त होती.

जैन मंदिर पांढरे शुभ्र संगमरवरी.

 

जामनगरी गेला आणि तिथली स्मशानभूमी नाही पहिली, असं काही होत नाही.

अत्यंत सुन्दर, कल्पक, वेल मेंटेन असे हे ठिकाण.

मुख्य अग्नी देण्याच्या ठिकाणा अगोदर एका बागेतून जावे लागते.अनेक पौराणिक कथा सांगणारी भित्ती शिल्पे.रामायण महाभारतातली प्रासंगीके पहायला मिळतात.

 

इथंच श्रीकृष्णाचे अंत्य समयाची एक मूर्ती आहे तिला विशिष्ट ठिकाणाहून पाहिल्यास, एक मृग दिसते ती मूर्ती.आणि मग समजते त्या पारध्याने का बाण मारला होता.

त्या अँगलने हरीनच दिसत होते ना !

 

अलौकीक आहे हे सर्व.

 

असो,अशी ही माझी दशावतारी खाद्य संस्कृती.

 

।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।

 

–राजा जोशी / 9823687519

🙏 🙏 🙏 🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा