You are currently viewing बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं?

बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित संवेदनशील कथा*

 

*’बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं?’*

 

मधु नाना न्यायालयात रजिस्ट्रार म्हणून कार्यरत होते. कार्यालयात त्यांचा शब्द म्हणजे आदेश. कडक शिस्त, वक्तशीरपणा आणि संस्कार याबाबत ते कुठलीही तडजोड करीत नसत.घरातही त्यांचा स्वभाव फारसा वेगळा नव्हता. तीनही मुलांनी अभ्यास करावा, चांगली संगत ठेवावी आणि आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहावे, एवढीच त्यांची अपेक्षा होती.त्यांच्या या शिस्तीमुळे घरात कधी भीती तर कधी आदर असा एक वेगळाच दरारा होता. माधवीताई मात्र त्याच्या अगदी विरुद्ध.सतत हसतमुख, मनमिळाऊ,साध्या सरळ आणि कर्तव्यदक्ष.संसाराचा गाडा त्या हसत हसत ओढत होत्या. त्यांना तीन मुलं समीर,सागर आणि सुहास.समीर आणि सागर अभ्यासात हुशार होते; पण दोघांचे जग वेगळे होते.मित्र,मैत्रिणी,गप्पा, फिरणे आणि स्वतःच्या मस्तीत जगणे,त्यांना अधिक आवडायचे. सुहास मात्र दोघांपेक्षा वेगळाच होता.घर,अभ्यास आणि नोकर एवढीच त्याची दुनिया.

 

मधु नाना न्यायालयात नोकरी करत असतानाही सुहासला वडिलांवर आपल्या शिक्षणाचा संपूर्ण भार टाकायचा नव्हता. सकाळी कॉलेज आणि दुपारी एका मोबाईलच्या दुकानात अर्धवेळ नोकरी करून तो स्वतःचा शैक्षणिक खर्च भागवत असे.कुणी विचारले,“अरे,एवढं कशाला करतोस?”तो फक्त हसायचा.

“नानांनी आमच्यासाठी खूप केलंय. आता माझा खर्च तरी मी स्वतः केला पाहिजे.”घरातील मोठा मुलगा म्हणून त्याला जबाबदारीची जाणीव लहानपणापासूनच होती. ‘ज्यांच्या अंगी मोठेपण, ते देवासमान…’हे वाक्य सुहासला पाहिल्यावर खरे वाटावे,असा त्याचा स्वभाव होता.शांत, सुसंस्कृत,कमी बोलणारा, मनमिळाऊ आणि मदतीला सदैव तत्पर.त्यामुळे घरातच नव्हे, तर संपूर्ण परिसरात तो सर्वांचा लाडका होता.काळ पुढे सरकत गेला.समीरचे शिक्षण पूर्ण झाले आणि पहिल्याच प्रयत्नात त्याला बँकेत मॅनेजरची नोकरी मिळाली. सागरलाही पहिल्याच प्रयत्नात बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून सरकारी नोकरी मिळाली.मधु नाना आणि माधवीताईंच्या चेहऱ्यावर आनंद होता.पण त्या आनंदाच्या सावलीत सुहासची चिंता लपलेली होती.

सुहासने अनेक परीक्षा दिल्या. प्रयत्न केले.पण सरकारी नोकरी त्याच्या नशिबात नव्हती.शेवटी एका खासगी कंपनीत त्याला नोकरी मिळाली.“नोकरी कोणतीही असो, प्रामाणिकपणे करायची,” एवढेच त्याने स्वतःला सांगितले.

समीर आणि सागरची लग्नेही झाली.कारण समीरने आपल्या वर्गमैत्रिणीशी घरच्यांच्या नाराजीची पर्वा न करता लग्न केले. सागरचेही चांगले स्थळ आल्याने त्याचे लग्न सहज जमले.दोन्ही धाकटे भाऊ बोहल्यावर चढले.घरात लग्नाची सनई वाजली.पण मोठा भाऊ सुहास मात्र अजूनही अविवाहितच होता.हे दुःख कुठेतरी त्याच्या मनाला टोचत होते.पण त्याने कधी ते चेहऱ्यावर आणले नाही.

“माझंही होईल कधीतरी,” एवढंच म्हणत तो पुन्हा आपल्या कामाला लागायचा.

 

मधु नाना आणि माधवीताई मात्र सुहाससाठी स्थळे पाहत होते. मुलगी देणाऱ्यांना सुहासची खासगी नोकरी खटकायची. कुणाला सरकारी नोकरी हवी होती, कुणाला मोठा पगार, तर कुणाला स्वतःचे घर.हळूहळू सुहासच्या मनात एक प्रश्न घर करू लागला.“माझ्यात कमी काय आहे?” पण तो प्रश्न त्याने कधी कुणाला विचारला नाही.एके दिवशी माधवीताईंनी आपल्या भावाला शितल आणि सुहासच्या लग्ना बद्दल सुचवले.शितल एकुलती एक मुलगी होती. शिक्षिका होती. तिची स्वतःची स्वप्ने होती, स्वतःच्या आयुष्याबद्दल काही ठाम अपेक्षा होत्या.

सुरुवातीला अशोकनेही नकार दिला.“शितलला तिच्या बरोबरीचा मुलगा हवा आहे.” मधु नाना आणि माधवीताईंनी खूप समजावले.पण शितलही तयार नव्हती.चार वर्षे अशीच निघून गेली.स्थळे आली, गेली.शितलचेही एका ठिकाणी लग्न जुळता जुळता राहून गेले. कदाचित काही नाती नशिबात लिहिलेली असतात.कितीही दूर गेली तरी ती पुन्हा आपल्या दाराशी येतात. आणि अखेर तसेच झाले.

चार वर्षांनी शितलने सुहासला होकार दिला.लग्न ठरले.सुहासच्या घरात आनंद पसरला.पण शितलच्या मनात मात्र अजूनही काहीतरी अपूर्ण होते.पहिल्यांदा सुहासला सासरी बोलावले गेले.

सुहासला वाटले नवरदेव पहिल्यांदा घरी येणार म्हटल्यावर. घरात उत्साह असेल, उत्सुकता भेटण्याची आतुरता असेल हशा असेल,स्वागताची लगबग असेल. पण सुहास जसा विचार करत होता तसं काहीच दिसून आले नाही घरातल्या वातावरणात तो उत्साह नव्हता.शितलच्या चेहऱ्यावरही आनंदापेक्षा औपचारिकता अधिक होती.काही वेळाने दोघे बाहेर गेले.

शितलने शांतपणे पण ठाम आवाजात सुहासला सांगितले

“माझ्या पगाराबद्दल तुम्ही कधीही विचारणार नाही. लग्नानंतर आपण दोघे स्वतंत्र असू. माझं आयुष्य मी माझ्या पद्धतीने जगणार आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा. माझ्या स्वप्नांमध्ये कुणी हस्तक्षेप करू नये.पत्नी म्हणून माझी कर्तव्ये मी पार पाडेन; पण मला कोणत्याही बंधनात जगायचं नाही.” सुहास बराच वेळ शांत राहिला.तो मनातून हादरला होता.

 

खरंतर सुहासला एक अशी पत्नी हवी होती जी त्याच्या शांत स्वभावाला समजून घेईल, त्याच्या कष्टांना ओळखेल आणि त्याच्या मनात डोकावेल.पण त्याच्या वाट्याला आलेले वास्तव वेगळे होते.घरी परतल्यावर त्याने मधु नाना आणि माधवीताईंना सगळे सांगितले.माधवीताईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

“काळजी करू नकोस रे. लग्न झालं की सगळं बदलतं. संसार माणसाला जबाबदारी शिकवतो.”

मधु नानाही म्हणाले,“तू चांगला आहेस.चांगुलपणाला वेळ लागतो, पण त्याची किंमत नक्की कळते.”

सुहासने आई-वडिलांकडे पाहिले.

हसला.आणि शेवटी आपल्या कपाळावर मुंडावळ्या बांधून घेतल्या.शितलने उंबरठा ओलांडला.दोघांचा संसार सुरू झाला.पण माधवीताई म्हणाल्या होत्या तो बदल झाला नाही.

शितल लग्नाआधी जशी होती, तशीच राहिली.सुहासने मात्र एक निर्णय घेतला “तिच्यावर माझ्या मनाचा भार कधीच टाकायचा नाही.”‌तिने कधी त्याच्या पगाराची चौकशी केली नाही म्हणून त्यानेही तिच्या पगाराबद्दल कधी विचारले नाही. तिने तिचे आयुष्य तिच्या पद्धतीने जगावे,यासाठी त्याने कधी अडथळा आणला नाही.पण स्वतः मात्र दिवस-रात्र कष्ट करत राहिला.

या संसारात त्याला पती म्हणून प्रेम कमी मिळाले, पण पती म्हणून त्याचे प्रेम कमी झाले नाही.

 

काळ पुढे गेला.त्यांना मुलगा झाला.,सूरजच्या जन्माने सुहासचे जग बदलले.त्याच्यासाठी मुलगा म्हणजे केवळ मुलगा नव्हता.तो त्याच्या आयुष्याचा अर्थ होता. शाळेची फी,पुस्तके,क्लास,परीक्षा कॉलेज प्रत्येक खर्चासाठी सुहास स्वतःच्या गरजा बाजूला ठेवत गेला.नवीन शर्ट घ्यायचा राहून गेला.चप्पल जुनी झाली तरी त्याने बदलली नाही.कंपनीत अतिरिक्त काम मिळाले तर तो ते स्वीकारायचा.कधी रात्री उशिरा घरी यायचा.सूरज झोपलेला असायचा.तो हळूच त्याच्या खोलीत जायचा त्याच्या कपाळावर हात ठेवायचा.आणि पुटपुटायचा “बेटा तू मोठा हो रे बाबा… माझ्यापेक्षा मोठा हो.” पण शितल, सूरजला सतत एकच सांगायची की “तुझ्या शिक्षणासाठी मीच सगळं केलं.”हळूहळू बाप आणि मुलामध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली.सुहासला ते जाणवत होते.पण त्याने कधी विरोध केला नाही.कारण त्याला वाटत होते

“मुलाच्या मनात आईबद्दल प्रेम कमी होऊ नये.” सूरज हुशार होता.

त्याने वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली.मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.फी मोठी होती.सुहासने कर्ज काढले.अतिरिक्त काम केले.

स्वतःच्या गरजा कमी केल्यात.

कधी-कधी जेवणही चुकवले.

पण सूरजच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.सूरज डॉक्टर झाला.

पदवीदान समारंभाचा दिवस आला.सगळे आनंदाने भारावून गेले होते. सूरजने व्यासपीठावर उभे राहून भाषण केले.तो म्हणाला,

 

“माझी आई नसती तर मी आज डॉक्टर झालो नसतो. तिने अनेक संकटांवर मात करून मला घडवलं.”टाळ्यांचा कडकडाट झाला.शितलच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.पण…….सुहास मात्र…..मागच्या रांगेत एकटाच शांत उभा होता.त्याच्या डोळ्यांतही पाणी होते.पण ते अश्रू आनंदाचे होते की वेदनेचे, हे त्यालाच कळत नव्हते.कार्यक्रम संपला.सूरज धावत आईजवळ गेला.आईचा पाया पडला.शितलने आपल्या मुलाला मिठीत घेतले.पण एक बाप…. मात्र थोड्या अंतरावर उभा राहून आपल्या मुलाकडे पाहत राहिला.काही क्षणांनी सूरजची नजर त्याच्यावर पडली.तो जवळ आला.“बाबा…” सुहासने हात पुढे केला.सूरजने त्याला मिठी मारली.

त्या एका मिठीत सुहासने वर्षानुवर्षे दडवून ठेवलेल्या भावना मोकळ्या केल्या.त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.कारण बापाला रडण्याचा अधिकार असतो, पण मुलासमोर तो रडत नाही.काळ पुढे सरकला.

सूरज पुण्यात स्थिरावला.एक दिवस तो आईला म्हणाला,

 

“आई, आता तुला मी कायमची पुण्याला घेऊन जातो.”शितल आनंदली.सूरजने मग सहजपणे सुहासकडे पाहिले.“बाबा, तुम्ही माझ्यासाठी काय केलंय? तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाण्याचा प्रश्नच नाही.”

तो क्षण सुहासच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आघात होता. ज्याच्यासाठी त्याने आयुष्य घालवले, त्या मुलाच्या मनात स्वतःसाठी जागाच नव्हती.तो काही बोलला नाही.फक्त हसला. त्या रात्री तो घराच्या गच्चीवर एकटाच बसला होता.

 

माधवीताईंच्या जुन्या आठवणी, सूरजचे बालपण, त्याची पहिली शाळा, पहिला गणवेश, पहिली सायकल,मेडिकल कॉलेजची फी…सगळं त्याच्या डोळ्यांसमोर येत होतं.त्याने खिशातून जुने पाकीट काढले.त्यात सूरजच्या लहानपणीचा एक फोटो होता.

सुहासने फोटोवरून हात फिरवला.

आणि हळूच म्हणाला “बाळा,मी तुझ्यासाठी खूप केलंय रे….पण तुला ते माहित नाही. फक्त तू माझ्यासारखा एकटा पडू नकोस…” सुहासच्या डोळ्यांतून दोन थेंब खाली पडले.पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा नेहमीसारखा उठला.कारण बाप दुःखातही घर चालवत असतो.काही दिवसांनी पुण्यात शितलचा अपघात झाला.

तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.तपासणीत समजले की तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत.सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

सुरजच्या सिनियर डॉक्टरांनी

“किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.” सूरज डॉक्टर होता.पण त्या क्षणी तो मुलगा झाला होता.आईला वाचवायचे होते.वेगाने तपासण्या सुरू झाल्या.

कुटुंबातील कुणाचीही किडनी जुळत नव्हती.तेव्हा सुहास शांतपणे डॉक्टरांसमोर गेला.

“माझी तपासा.” सगळे थबकले.

सूरजने त्याच्याकडे पाहिले.

“बाबा… तुमची?”

सुहासने फक्त एवढेच म्हटले

“ती माझी बायको आहे.”तपासण्या झाल्या.किडनी जुळली. ऑपरेशनची तारीख ठरली.

 

ऑपरेशनच्या आदल्या रात्री सुहास एकटाच रुग्णालयाच्या खिडकीजवळ उभा होता.सूरज त्याच्याजवळ आला.काही बोलू शकला नाही.सुहासने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.“घाबरू नकोस. तुझी आई बरी होईल.” सूरजच्या डोळ्यांतून अश्रू आले.“पण बाबा, तुमचं काय?” सुहास हलकेच हसला.

“बापाचं काय असतं रे? बापाला काही होत नाही.” ऑपरेशन झाले.शितल वाचली.सुहासही हळूहळू बरा झाला.काही दिवसांनी शितलला शुद्ध आली.तिने डोळे उघडले.समोर सुहास बसला होता.

कृश झालेला चेहरा.डोळ्यांखाली काळी वर्तुळे.शरीर अशक्त.पण चेहऱ्यावर समाधान.शितल त्याच्याकडे बराच वेळ पाहत राहिली.तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.तिला पहिल्यांदा जाणवले

ज्याच्यावर तिने आयुष्यभर अन्याय केला, त्यानेच तिचे आयुष्य वाचवले होते.तिने सुहासचा हात पकडला.

“आहो…”तो शांत होता.

“मला माफ करा.” सुहास काहीच बोलला नाही. शितल रडत म्हणाली,“मी तुम्हाला कधीच समजून घेतलं नाही. तुमच्यावर प्रेमही केलं नाही. तुमच्या कष्टांना कधी किंमत दिली नाही.पण तुम्ही… तुम्ही माझ्यासाठी तुमची किडनी दिलीत.” सुहासने तिच्याकडे पाहिले.त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले.

“उशीर झाला शितल.”

“नाही… मला एक संधी द्या.”

सुहासने डोके हलवले.

“काही नाती तुटत नाहीत शितल… पण त्यांच्यातलं काहीतरी मरून जातं.” शितल नि:शब्द झाली सुहास पुढे म्हणाला,“तू तुझं आयुष्य जग.मी माझं जगतो. तुझ्यावर माझा राग नाही.पण जे प्रेम तू आधीच स्विकारायला हवा होतास,ते आता मागून काय उपयोग?” शितलच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला.

“मला माफ करा हो‌…मी खरचं चुकले मी तुम्हाला समजून घेतले नाही….”

तेवढ्यात सूरज धावत आत आला.

त्याने वडिलांकडे पाहिले.

त्याच्याही डोळ्यांत अपराधाची जाणीव होती.तो काही न बोलता सुहासच्या पायाशी बसला.त्याने वडिलांचे पाय घट्ट धरले.

“बाबा… मला माफ करा.”

सुहासने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला.“उठ रे बाळा”

पण सूरज उठत नव्हता.

“बाबा, मी तुम्हाला कधीच समजून घेतले नाही.” सुहासच्या डोळ्यांत पाणी आले.त्याने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला.

“बाप समजून घेण्यासाठी बाप व्हावं लागतं रे.”

सूरज हुंदके देत म्हणाला,

“तुम्ही माझ्यासाठी किती केलं… आणि मी तुम्हाला विचारलं ‘तुम्ही माझ्यासाठी काय केलं?’”

सुहासने डोळे मिटले.काही क्षण तो शांत राहिला.मग म्हणाला “त्या प्रश्नाचं उत्तर आज मिळालं ना?”

 

सूरजने वडिलांच्या पायांवर डोके ठेवले.पण त्या क्षणी सुहासच्या मनात एक वेगळीच वेदना उठली.

ज्या मुलाच्या हृदयात बापासाठी जागा नव्हती, त्याने आज बापाच्या पायावर डोकं ठेवलं होतं…पण आयुष्यभर बापाच्या छातीवर डोकं ठेवून रडण्याची संधी मात्र त्याने गमावली होती.शितलही सुहासकडे पाहत होती.तिच्या डोळ्यांत आता प्रेम होते.पण सुहासच्या मनात मात्र एक अनामिक शांतता होती

त्याने खिडकीबाहेर पाहिले.

संध्याकाळचे ऊन हळूहळू मावळत होते.सुहासच्या चेहऱ्यावर त्या मावळत्या सूर्याची किरणे पडली.

तो मंद हसला.कदाचित आयुष्यभर ज्याची वाट पाहिली,ते प्रेम त्याला शेवटी मिळाले होते…पण फार उशिरा.कारण काही जखमा भरतात पण त्यांचे व्रण आयुष्यभर राहतात.आणि काही माणसे आपल्या आयुष्यात इतके देऊन जातात की त्यांची किंमत कळते तेव्हा…त्यांना परत देण्यासाठी आपल्या हातात काहीच उरलेले नसते.सुहास हा फक्त एक बाप नव्हता.तो त्याग करणारा नवरा होता.तो न बोलता संसार वाहणारा पती होता.तो स्वतःच्या स्वप्नांना बाजूला ठेवून मुलाचे स्वप्न पूर्ण करणारा पिता होता.आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो प्रेम मागत नव्हता; प्रेम देत होता.म्हणूनच त्याचे प्रेम इतके मोठे होते…

आणि त्याची वेदना त्याहूनही मोठी.काय……

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा