*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मानसी शरश्चंद्र भोसेकर लिखित आरोग्यदायी लेख*
*लेकीतील आईसाठी*
१ )भाग पहिला.
हा लेख मोठा आहे पण जरूर वाचा. ज्यांच्या
लेकी-सुना बाळंतपणासाठी आल्या आहेत किंवा येणार आहेत त्यांनी जरूर वाचा.
मैत्रिणींनो,
मी सौ .मानसी भोसेकर माझ्या मनातील काही विचार तुम्हाला सांगते.
आपल्यापैकी काहीनी हे अनुभवलं असेल.
मुलीचं शिक्षण झालं, नोकरी लागली की आपल्याला तिच्या लग्नाचे वेध लागतात. योग्य स्थळ बघून लग्न झालं की छान वाटतं. नंतर वर्षाचे सण दिवाळसण संक्रांतसण व मंगळागौर झाली, लग्नाला वर्ष झालं की मनात एक नविन विचार डोकावू लागतो. आता एक मूल झालं म्हणजे बरं. तसं आपण तिला आडून आडून विचारतो पण. आपल्याकडून सासरी जाताना मनात विचार येतो.
” अबके जब वापस आए गोरी ।
गोद भरी ले आए गोरी “।
” बंधी रहे ये प्यारकी डोरी।।”
मग तो आनंदाचा क्षण येतो. आपण” आजी होणार” ही गोष्ट किती आनंददायी असते. मनात आनंद, थोडी काळजी व जबाबदारीची संमिश्र भावना असते.
मग मुलगी बाळंतपणासाठी माहेरी येते.
पूर्वी एकत्र कुटुंबात मार्गदर्शन करणाऱ्या मोठ्या व्यक्ती असत, त्यांच्याकडे अनुभवाचा खजिना असायचा. त्यामुळे सर्व काही सुरळीत होत असे. आता विभक्त कुटुंब असल्याने प्रत्येकजण आपापल्या नोकरी – व्यवसायात व्यस्त असल्याने एकटीलाच सगळं करावं लागतं. सगळं नीट मनासारखं व्हावं अस वाटत म्हणून काय काय तयारी करावी. या बद्दल थोडसं बोलूया. आपल्याला मदत करण्यासाठी कोणी येऊ शकेल का याचा विचार करावा. आपण हवे असेल तेव्हा मदत घ्यावी व त्यांना हवी असेल तेव्हा मदत करावी. त्यामुळे खूप धीर येतो, आधार वाटतो. माझ्याकडे मदतीसाठी माझी ताई आली होती.
प्रथम एका डायरीत कामांची यादी करावी. त्यानंतर सामानाची यादी करावी .
बाळ घरात आल्यावर दिवसाचे २४ तासही कमी वाटतात. प्रसुतीनंतर ३ ते ४ दिवसात बाळबाळंतीणीला घरी आणतात. बाळ घरी येण्यापूर्वी बाळासाठी सुती कपडे (शक्य तो वापरलेले) धुवून ठेवावे. सुती साड्या, ओढणी झबलं, टोपी वगैरे. बाळबाळंतिणीला मालिश व अंघोळ घालण्यासाठी बाई ठरवणे. लाकडी कोळसा, गोवरी, धूप, ओवा आणणे.
मेथीदाणे थोडे गरम करून मिक्सरवर पूड करून गाईच्या तुपात भिजत घालावी. मेथी जितकी जास्त भिजेल तेवढी चांगली. १ ते १ १/२ महिना मेथी भिजवावी.
बाळंतिणीला खायला काय द्यावे या बद्दल थोडंसं
मी कोणी डॉक्टर किंवा आहारतज्ञ नाही. घरातील मोठ्या व्यक्तीकडून ऐकलेलं व निरीक्षणाने आत्मसात केलेलं आपल्याला सांगते. या बाबतीत प्रत्येकचं मत वेगळं असू शकतं. तरी कृपया आपल्याला भावेल असं करावं.
पंचामृत
गरोदरपणात व बाळंतपणात पंचामृत घेणे
खूप छान असते. मी माझ्या मुलीला हे सांगितले. सासरी असताना माझ्या विहिणबाई तिला आठवणीने देत व माहेरी आल्यावर मी देत होते. ती रोज घेत होती. त्याने पचन सुधारते व बाळाची स्किन छान होते.
पंचामृत
एका वाटीत (शक्यतो चांदीची वाटी) ५ ते ६ चमचे गाईचे दूध, २ चमचे गाईचे तूप, १ चमचा दही, १ चमचा साखर व १ चमचा मध घालून थोडावेळ ठेवावे नंतर घ्यावे. (देवाला नैवेद्य दाखवावा. नंतर तो प्रसाद ग्रहण करावा.)
बाळंतिणीला पौष्टिक आहार द्यावा. त्यात प्रथम आळीवाचे लाडू, ते संपल्यावर डिंकाचे नंतर मेथीचे लाडू करावे. एकावेळी एक प्रकारचे लाडू करावे. एकदम सगळे केल्यास गरम पडतील. आळीव, डिंक व मेथीलाडू पाककृती सगळ्यांना माहित असल्याने देत नाही.
आजकाल दवाखान्यात जेवणाची सोय असते. काही दवाखान्यात बाहेरचं काही आणू देत नाहीत म्हणून बाळ बाळंतीण घरी आल्यावर हे सर्व सुरू करावं.
बाळंतिणीला खायला काय द्यायचे या विषयी थोडा विचार.
१) सकाळी पाव चमचा सुंठपावडर गुळ व तूप (शक्यतो गायीचे तूप वापरावे) एकत्र करून रोज द्यावे.
२) आवळा पावडर, हळद व मध मिक्स करून द्यावे.
३) खसखस व बदामाची खीर ही रोज सकाळी १० दिवस. आवडत असल्यास नंतरही द्यावी.
४) स्नान झाल्यावर रवाळ कणकेचा शिरा व दूध द्यावे.
५) दुपारी जेवण
६) जेवणानंतर ३ तासांनी आळिवाचा लाडू
७) रात्री जेवण
८) झोपण्यापूर्वी दूध
बाळंतिणीला जास्त उष्मांकाची (कँलरीज) आवश्यकता असते म्हणून जास्त खावे परंतु हे खाणं एकाचवेळी खूप न खाता विभागून खावे
सकाळचा नाश्ता, जेवण, दुपारचं खाणं व रात्रीचे जेवण आपल्या सोयीनुसार ठरवावं. रात्री फार उशिरा जेवू नये. प्रत्येक खाण्यानंतर मुखशुद्धी किंवा ओवा शोपा खाव्या.
आता मी काही पाककृती देते.
१) मुखशुद्धी _पाचक चूर्ण
साहित्य : ५० ग्रँम ओवा
१०० ग्रँम बाळंतशोप
२०० ग्रँम बडीशोप
३ चमचे सुंठ पावडर
३ चमचे जेष्ठमध पावडर
३ चमचे काळं मीठ
कृती :ओवा, शोपा व बडीशोप वेगवेगळं भाजून घ्या .थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटा. नंतर त्यात सुंठ, जेष्ठमध व काळंमीठ घालून एकत्र करा. पाचक चूर्ण तयार. सुंठ जेष्टमध व मीठ याचं प्रमाण आपल्या आवडी नुसार कमी _ जास्त करा.
यात मी विड्याची पानं वाळवून कुटून घालते .
२) ओवा शोपा
साहित्य: ५० ग्रँम ओवा
५० ग्रँम बाळंतशोपा
१ वाटी किसलेलं खोबरं
१/२ (अर्धी वाटी) भाजलेले तीळ.
१/४ (पाव वाटी) जवस/ अळशी.
काळंमीठ
कृती: ओवा, शोपा निवडून, पाखडून घ्याव्या. पाण्यात काळंमीठ कालवून ते पाणी ओवा शोपाला लावून ठेवावं. मंद आचेवर सुक्या खोबऱ्याचा कीस भाजावा. नंतर तीळ भाजावे, जवस भाजावे. आता ओवा व शोपा भाजाव्या .सगळं वेगवेगळं भाजावं .सगळं थंड झाल्यावर एकत्र करून घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावं .
जेवण, नाश्ता झाल्यावर चावून चावून खावं. जरा तिखट लागतं परंतु पचनास उत्तम .
तांबूल : नागवेलीचे पान (विड्याचे पान)
पानाला चुना किंवा काथ न लावता नुसत्या पानात वरील पाचकचूर्ण ,ओवाशोपा ,वेलदोडा व लवंग घालून दुपारच्या जेवणानंतर द्यावा .
धन्यवाद
सौ. मानसी शरश्चंद्र भोसेकर.
©🖊सौ. मानसी शरश्चंद्र भोसेकर.
( क्रमश:)
