You are currently viewing सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात संपन्न
Oplus_16908288

सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील जैवविविधतेची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – जैवविविधता तज्ज्ञ दुर्गा ठिगळे

मालवण :

कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘जैवविविधता संवर्धन’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या कै. नरहरी प्रभुझांट्ये सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य कैलास राबते होते. व्यासपीठावर IQAC समन्वयक प्रा. संग्रामसिंह पवार, NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक आणि डॉ. संकेत बेळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेच्या लक्ष्य गीताने झाली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे औचित्य स्पष्ट केले. तसेच महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमासह विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक जैवविविधता तज्ज्ञ दुर्गा ठिगळे यांनी विद्यार्थ्यांना देशातील विविध अभयारण्ये, त्यांचे प्रकार आणि विशेषतः मालवण सागरी अभयारण्याची माहिती देत किनारी जैवविविधतेचे महत्त्व स्पष्ट केले. ग्रामपंचायतीमध्ये People’s Biodiversity Register (PBR) ठेवण्यात येतो. जैवविविधतेची नोंदणी कशी करावी, त्यामध्ये कोणत्या प्रकारची माहिती संकलित केली जाते, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील जैवविविधतेची नोंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

किल्ले निवती येथील डुंगोबाच्या देवराईतील विविध प्रजाती तसेच ‘सुंदरी’ या कांदळवन प्रजातीची त्यांनी रोचक माहिती दिली. तसेच अभिनेते सयाजी शिंदे यांनी देवराईला दिलेली भेट आणि तेथील संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला.

यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. पर्यावरणपूरक सजावट, निर्माल्यातून आकर्षक रांगोळी आणि मातीचा गणपती बसविणे या उपक्रमांमध्ये रिद्धी काजरेकर, राहुल शिरोडकर, क्रांती पालव, भूमी परब, वैष्णवी राजाराम सावंत, वैष्णवी पांडुरंग सावंत, वेदिका परब, विशाल वडवलकर, हेमांगी चव्हाण, रिद्धी केळुस्कर, शार्दुल पावसकर, सुभक्ती सांडव, बिरू मानवर, वैभवी गावडे, देवांग तारी, कौस्तुभ खवणेकर, चिराग पाटकर आणि तन्मय नाईक या NSS स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

तसेच NSS स्वयंसेवक व SYBSc विद्यार्थी स्वप्नील गोसावी यांच्या सर्प संवर्धन आणि निसर्गशाळा या उपक्रमातील कार्याबद्दल दुर्गा ठिगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. SYBSc ची NCC Cadet रूपाली करंगुटकर हिने राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धेत प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित NSS स्वयंसेवकांचे पाच गट करण्यात आले. प्रत्येक गटाला महाविद्यालयाच्या परिसरातील विविध वनस्पती, झुडुपे, कीटक आणि इतर जैविक घटकांचे निरीक्षण करून त्यांच्या प्रजातींची नोंद करण्याचे कार्य देण्यात आले. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. रिद्धी काजरेकर, रिद्धी केळुस्कर, सृष्टी दिघे, सानिका भोगावकर आणि क्रांती पालव यांनी पाच गटांचे नेतृत्व केले.

त्यानंतर सर्व गट महाविद्यालयाच्या ग्रंथालयात एकत्रित आले. गटप्रमुखांनी आपल्या गटाने केलेल्या निरीक्षणाची माहिती सादर केली. त्यावर तज्ज्ञ मार्गदर्शक दुर्गा ठिगळे यांनी विश्लेषण केले आणि सर्व गटांच्या कार्याचे कौतुक केले. या उपक्रमातून महाविद्यालय परिसरातील एकूण ५१ प्रजातींची नोंद करण्यात आली. जैवविविधतेचे प्रत्यक्ष निरीक्षण, नोंदणी आणि संवर्धनाचा अनुभव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाला. मुख्य मार्गदर्शक दुर्गा ठिगळे यांच्या हस्ते पाचही गटप्रमुखांना गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

प्रा. अनघा टिकले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच नष्ट होत चाललेल्या ‘दीपकाडी’ या झुडुपाची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली आणि आपल्या आजूबाजूच्या जैवविविधतेबाबत संवेदनशील राहण्याचे आवाहन केले. डॉ. संकेत बेळेकर यांनी आभारप्रदर्शन केले.

कार्यक्रमास स्टाफ सेक्रेटरी डॉ. देविदास हारगिले, NCC ऑफिसर डॉ. मल्लेश खोत तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि NSS स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमात एकूण ६० NSS स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

जैवविविधतेची ओळख, तिची नोंद आणि संवर्धनाची जबाबदारी विद्यार्थ्यांच्या कृतीतून रुजविणारा हा राष्ट्रीय सेवा योजना दिवस यशस्वी करण्यासाठी प्रा. अनघा टिकले, प्रा. योगिता सावंत, डॉ. संकेत बेळेकर, गौतम मानवर, हर्षद पाटकर, रिद्धी काजरेकर, हेमांगी चव्हाण, क्रांती पालव, पार्थ तावडे, सोहम भोगले, सानिका भोगावकर, राधाकृष्ण मालंडकर, अमितकुमार यादव, सिद्धी काजरेकर आणि शार्दुल पावसकर या संयोजन समितीने परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा