छत्रपती संभाजी नगर येथील महात्मा गांधी विद्यापीठाने प्रा. आ ह साळुंखे यांना सर्वोच्च डी.लिट. जाहीर केली आहे त्यानिमित्त
प्रा.डॉ. आ.ह. साळुंखे जसे दिसले तसे
छत्रपती संभाजी नगर येथील महात्मा गांधी विद्यापीठाने सुप्रसिद्ध साहित्यिक पुरोगामी विचारवंत साताऱ्याचे प्रा. डॉ.आ ह साळुंखे यांना डी.लिट ही उपाधी जाहीर केली केली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील महात्मा गांधी विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय निश्चितच अभिनंदनीय आहे. खरं म्हणजे श्री आ ह साळुंखे यांचे काम या सर्वोच्च पदवी पेक्षा देखील खूप खूप मोठे आहे. त्यांचा एकेक ग्रंथ म्हणजे पीएच.डी किंवा डी..लीट.चा विषय आहे.
योगायोगाने त्यांचे माझे ऋणानुबंध खूप जवळचे आहेत. अमरावतीला त्यांचा मुक्काम एकतर माझे व्याही श्री प्रदीप वानखडे यांच्याकडे राहतो किंवा माझ्याकडे जिजाऊ नगर मध्ये. त्याला कारणही तसेच आहे .माझे जावई कर्नल सारंग वानखडे हे सातारा सैनिक स्कूलमध्ये शिकले .त्यामुळे माझे व्याही श्री प्रदीप वानखडे यांचे नेहमी सातारा येथे जाणे येणे असायचे. त्यामुळे त्यांच्या साळुंखे सरांच्या नियमित भेटी होत्या. त्यामुळे सर बहुतांश त्यांच्याकडे थांबायचे.
दुसरे कारण म्हणजे सरांची प्रकृती लक्षात घेता त्यांना हॉटेलमधील जेवण मानवत नाही. तिखट नसलेले साधे जेवण पाहिजे आणि त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना हवे तसे जेवण आमच्या विहीणबाई श्रीमती विणा वानखडे ह्या करून देण्यामध्ये पारंगत आहेत. त्याशिवाय जो जिव्हाळा जी आत्मियता पाहिजे ती वानखडे परिवारामध्ये आहे.
सरांचा कार्यक्रम अमरावतीला असला की आम्ही सगळेजण कामाला लागतो. सर आल्यापासून तर सर जाईपर्यंत आम्ही त्यांच्या आजूबाजूला असतो .त्यांना काय हवे काय नको ? त्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था. कार्यक्रम दुसऱ्या संस्थेने आयोजित केलेला असला तरी त्यामध्ये आम्ही पुढाकार घेतो.
मागे सर माझ्याकडे थांबले होते तेव्हाची गोष्ट. सरांचा सहकारी त्यांच्याबरोबर आलेला नव्हता .त्यांच्या अमरावतीच्या मुक्कामामध्ये मी त्यांच्या सहकारी झालो. त्यांना कार्यक्रमाला अमरावतीच्या भव्य अशा श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये घेऊन जाण्यापासून त्यांना वेळोवेळी स्टेजवर भाषण सुरू असताना अर्ध्या अर्ध्या तासाला गरम चहा स्वतः मी त्यांना नेऊन देत होतो.
सरांची प्रकृती ठीक असताना सर खूप फिरले. अगदी लहान लहान गावात कार्यक्रम घेऊन त्यांनी लोकांना जागे केले. त्यांची वैचारिक बैठक पक्की करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि आता लिखाणाद्वारे सातत्याने तो करीत आहेत.
मराठा सेवा संघाचे पहिले मराठा साहित्य संमेलन अमरावतीच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेमध्ये संगीत सूर्य श्री केशवराव भोसले सभागृहात होते. सर अगोदरच्या दिवशी आले. मी शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर व सर आम्ही विश्राम भवनामध्ये थांबलो होतो. सरांनी अध्यक्षीय भाषण लिहून आणले होते. टंकलिखित किंवा छापून आणलेले नव्हते. खेडेकर साहेबांनी मला बोलाविले आणि मला म्हणाले काठोळे हे भाषण आजच्या आज तुम्हीच छापून देऊ शकता. माझा स्वतःचा छापखाना नव्हता . पण साहेबांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता व आहेही.मी होकार दिला. माझे सहकारी व डॉट कॉम चे संचालक श्री संजय तराळ यांच्या सहकार्याने मी ते भाषण रात्री तीन वाजता एक हजार प्रति मध्ये छापून घेतले.
श्री संजय तराळांचा प्रेस गाडगेनगरमध्ये .सर थांबलेले कॅम्प विश्राम भवनात. साधारणत: दोन ते तीन किलोमीटरचे अंतर. त्यात पाऊस सुरू. मी कारने प्रूफ इकडून तिकडून पोहोचवित होतो. सरांच्या ते लक्षात आले .सर म्हणाले काठोळे तुम्ही हा त्रास घेऊ नका. मीच प्रेसमध्ये येतो म्हणजे हा त्रास वाचेल. त्याप्रमाणे सर श्री संजय तराळ यांच्या गाडगे नगर मधील संविस कॉम्पुटरमध्ये आले. आणि त्यांनी तिथेच अध्यक्षीय भाषणाचे प्रूफ रिडिंग केले. शेवटी जेव्हा मी त्यांना विश्रामभवनात सोडले तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. त्या दिवशी मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम सकाळी आठ वाजता पासून ग्रंथ दिंडीने सुरू होणार होता. मला त्रास होऊ नये म्हणून हा प्रेमळ माणूस स्वतः प्रेसमध्ये बसून प्रूफ तपासत होता .ही फार मोठी गोष्ट आहे.
काही वर्षांपूर्वी मी साताऱ्याला सरांकडे थांबलो होतो. नाशिक येथे सरांचे व श्री गोविंद पानसरे यांचे व्याख्यान होते. श्री गोविंद पानसरे हे कोल्हापूरवरून साताऱ्याला आले. तेव्हा सरांजवळ मारुती व्हॅन होती. आम्ही साताऱ्याहून मारुती व्हॅनने नाशिकला निघालो. वाटेत संगमनेरच्या महाविद्यालयात एक कार्यक्रम केला.या दोन विभूतींच्या सोबत प्रवास करायला मिळाला. वैचारिक देवाण-घेवाण झाली .ही मोठी ठेव मला या प्रवासात मिळाली.
अधून मधून आम्ही साताऱ्याला सरांची भेट घ्यायला जातो. तेव्हा सर आग्रहाने आम्हाला त्यांच्या घरीच थांबवून घेतात. त्यांच्याबरोबर विचारविनिमय करताना त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे चालविला पाहिजे हे नकळत आमच्या मनात रुजून जाते.
सरांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असते. सरांचे आता एवढे वय झाले आणि प्रकृती साथ देत नसली तरी सरांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य सदैव कायम आहे.
मराठा सेवा संघ व श्री आ ह साळुंखे हे समीकरण खूप वर्षापूर्वी तयार झालेले आहे. शिवधर्माची स्थापना जेव्हा मातृतीर्थ शिंदखेडा राजा येथे झाली .त्यामध्ये शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी शिव धर्माच्या संहितेची मांडणी केली ती व्यक्ती म्हणजे आ ह साळुंखे सर.
आपण प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचायला बराच वेळ लागेल आणि तळागाळापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही हे लक्षात घेऊन सर सातत्याने लेखन करीत असतात .त्यांचे चिरंजीव सरांची पुस्तके चांगल्या प्रकारे लोकांसमोर आणण्याचा प्रमाणिक प्रयत्न करतात आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत. सरांची सर्वच पुस्तके खूप गाजलेली आहेत .विद्रोही तुकाराम या पुस्तकांने तर खरोखर क्रांती केली आहे.
छत्रपती संभाजी नगर येथील महात्मा गांधी विद्यापीठाने श्री साळुंखे सरांना डि.लीट देऊन खरोखर एका विचारवंतांचा योग्य तो मानसन्मान केला आहे. खरं म्हणजे हा मानसन्मान अगोदरच व्हायला पाहिजे होता.सरांची विचारसरणी समाजाला पुरोगामी बनविणारी दिशा देणारी आहे आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या न्यायाने त्यांचे कार्य सुरू आहे. ते कार्य असेच सुरू राहावे यासाठी सरांना हार्दिक शुभेच्छा .
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
