*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आजच्या सुंदर क्षणाला*
जपावे काळजात
आजच्या सुंदर क्षणाला
घ्यावे आनंदाला
भरभरून….
क्षण येतात
जातात तसेही निघून
अत्तरकुपीतून
आठवांचे….
शोधावे सौख्य
आजच्या प्रत्येक क्षणात
आलेला जीवनात
उत्साहाने….
कधी सावळले
येतात क्षण झाकोळून
पाऊस शिंपून
लख्ख…
व्यर्थ चिंता
गेलेल्या त्या क्षणांचे
येणा-या वेळेचे
स्वागत….
भरावा श्वासात
गंध उमलत्या फुलांचा
तेजोमय किरणांचा
शिडकावा…
हिरवाईने सजली
अवघी ही वसुंधरा
खळखळ रानझरा
वहातो...
इवली पावलं
ठुमकत चालती अंगणी
चैतन्य क्षणोक्षणी
जीवनात….
प्रत्येक क्षणाला
आपण सुंदर करावे
जीवनात रमावे
समरसून….!!
~~~~~~~~~~~~~~
अरुणा दुद्दलवार@✍️
