‘निरोगी आहोत’ हा गैरसमज टाळा; नियमित आरोग्य तपासणी गरजेची
डॉ. नंदादीप चोडणकर : वैश्यवाड्यात गणेशोत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी | प्रतिनिधी :
मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे आजार सुरुवातीच्या काळात कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता शरीरात बळावत राहू शकतात. त्यामुळे वयाची ठराविक वर्षे ओलांडल्यानंतर प्रत्येकाने नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदादीप चोडणकर यांनी केले.
वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात गणेशोत्सवानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. श्री हनुमान मंदिर उत्सव समिती आणि राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुख्यमंत्री श्री गणेश आरोग्य अभियान’ अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलनाने शिबिराचा शुभारंभ झाला.
यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. विशाल पाटील यांनी ‘विकसित भारत २०४७’ हे राष्ट्रीय मिशन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रथम स्वतः निरोगी राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. माजी सभापती तथा नगरसेवक आनंद नेवगी यांनी समाज निरोगी ठेवण्यासाठी अशा आरोग्य उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे नमूद केले. उत्सव समितीचे सचिव अण्णा म्हापसेकर यांनी प्रास्ताविकातून वैश्यवाड्यात राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
शिबिरात डॉ. नंदादीप चोडणकर, डॉ. विशाल पाटील, डॉ. सिद्धेश म्हापसेकर, डॉ. संकेत निर्मळ, डॉ. अमोल पल्हाळ, डॉ. निखिल यादव, डॉ. मुकुंद नाळे आणि डॉ. ऋतिक राज यांच्या पथकाने नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी केली. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला माजी नगरसेविका शुभांगी सुकी, गीता सुकी, आनंद आळवे, रूपेश कुडतरकर, राजेश पनवेलकर, मिलिंद सुकी, महेश म्हापसेकर, दीपक म्हापसेकर, गजा कोदे, महादेव गावडे, यश जीवने, प्रथमेश सुकी, विनू सुकी, सौ. सोनटक्के, इक्बाल शेख, अंकिता बांदेकर, ऋतिक कोरगावकर, आशा मुंज, सायली मुंज, प्रसाद म्हापसेकर आणि मयुरेश परब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संजय म्हापसेकर यांनी आभार मानले.
