You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात जल साक्षरता कार्यक्रम संपन्न

वैभववाडी महाविद्यालयात जल साक्षरता कार्यक्रम संपन्न

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘जल साक्षरता’ या विषयावर प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला.
जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार व नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार) “राष्ट्रीय जल मिशन” अंतर्गत जलसंवाद अर्थात जल साक्षरता हा प्रबोधनात्मक कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून दोन गटात घेण्यात आला. एका कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डाॕ.एन.व्ही.गवळी होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.श्री. एस.एन. पाटील यांनी पाण्याचा ऐतिहासिक संदर्भ देत पाण्याची उपलब्धता, वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या यामुळे होणारा पाण्याचा वाढता वापर, पाण्याचा होणारा गैरवापर, दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा वापर कसा करावा व त्याचे संवर्धन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती देऊन भविष्यात पाण्यावरून युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर नेहरू युवा केंद्र समन्वयक कु.चेतन राणे व प्रा.राहुल भोसले उपस्थित होते. पाण्याचा योग्य वापर करुन पाण्याचे संवर्धन केले पाहिजे असे आवाहन अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ. एन.व्ही.गवळी यांनी केले.


दुसरा कार्यक्रम महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. एम. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. पृथ्वीवरील पाण्याचा स्त्रोत, पाण्याची विभागणी, पाण्याचे प्रदूषण व मानवी जीवनात पाण्याचे महत्त्व यावर प्रा.संतोष राडे यांनी मार्गदर्शन केले. पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अस्तित्व पाण्याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे पाण्याचे संवर्धन खुप महत्त्वाचे आहे असे अध्यक्षीय भाषणात प्रा.ए.एम. कांबळे यांनी सांगितले.


या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.श्री.एस.एन.पाटील, कु.अतिश माईणकर व कु.सिद्धेश इंदप यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा