You are currently viewing श्री शिवाजी हायस्कूल तुळसला ३.५० लाखांची सौरऊर्जा प्रणाली

श्री शिवाजी हायस्कूल तुळसला ३.५० लाखांची सौरऊर्जा प्रणाली

जि.प. सदस्या सुजाता पडवळ यांच्या हस्ते लोकार्पण; शाश्वत ऊर्जेच्या दिशेने विद्यालयाचे महत्त्वपूर्ण पाऊल

वेंगुर्ला / तुळस :

रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल, तुळस येथे विद्यार्थ्यांना अधिक सक्षम शैक्षणिक वातावरण मिळावे, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या रु. ३ लाख ५० हजार किमतीच्या सोलर सिस्टिमचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या तथा शाळा समिती सदस्या सौ. सुजाता पडवळ यांच्या हस्ते फित कापून या सौरऊर्जा प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले.

प्रसिद्ध अभिनेत्री सौ. शिल्पा तुळसकर यांच्या विशेष प्रयत्नातून तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्थेच्या माध्यमातून विद्यालयाला ही सोलर सिस्टिम उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यालयाच्या वीज गरजा पूर्ण करण्यासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरणार असून, पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने विद्यालयाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

सोलर सिस्टिमच्या ठिकाणी तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्थेचे अध्यक्ष श्री. विष्णू परब यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. तुळस गावचे उद्योजक श्री. सुधीर झांट्ये यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर जि.प. सदस्या सौ. सुजाता पडवळ यांच्या हस्ते फित कापून सोलर सिस्टिमचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना सुजाता पडवळ यांनी विद्यालयासाठी शैक्षणिक तसेच पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सौरऊर्जेसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसह विद्यालयाला दीर्घकाळ लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले. विद्यालयाच्या विकासासाठी आवश्यक विविध सुविधा व उपक्रमांना आपल्या परीने सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमास तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्थेचे अध्यक्ष श्री. विष्णू परब, उद्योजक श्री. सुधीर झांट्ये, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व माजी सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. डिसोझा सर, स्थानिक प्रतिनिधी प्रमुख श्री. प्रकाश परब, संस्थेचे सेक्रेटरी श्री. वासुदेव नाईक, सदस्य श्री. मधुकर परब, श्री. भगीरथ माळकर, श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. विवेकानंद परब, शाळा समिती सदस्य श्री. पराग सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संदीप पेडणेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कोल्हे सर, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. विद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची शोभा वाढवली. उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, आभारपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सोलर सिस्टिमच्या लोकार्पणामुळे श्री शिवाजी हायस्कूल तुळसच्या शाश्वत विकासाला नवी ऊर्जा मिळाली असून, पर्यावरणपूरक उपक्रमातून विद्यालयाच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा