शासनाकडून कृष्णा कंपनीचे आठ महिन्यांचे शुल्क थकीत; सिटीस्कॅनसाठी रुग्णांकडून पैसे आकारण्याची वेळ
महाराष्ट्रातील ५७ सिटीस्कॅन केंद्रांवर परिणाम; थकीत बिलासाठी प्रदेश भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे राजू मसुरकर यांचे निवेदन
सावंतवाडी :
संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन मशीनद्वारे रुग्णांचे रिपोर्ट काढण्यासाठी शासनाकडून कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीला सरासरी आठ महिन्यांचे शुल्क अद्याप देणे बाकी आहे. शासनाकडून शुल्काची रक्कम थकीत असल्यामुळे कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, परिणामी सिटीस्कॅन तपासणीसाठी रुग्णांकडून शुल्क आकारले जात असल्याचे समोर आले आहे. हीच सिटीस्कॅन सेवा शुल्क आकारण्यामागील प्रमुख कारण असल्याचे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील विविध जिल्हा रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत PPP तत्त्वावर एकूण ५७ सिटीस्कॅन मशीन बसविण्यात आल्या आहेत. या माध्यमातून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना सिटीस्कॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबत आपण पुणे येथील कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नुकतीच चर्चा केली असून, शासनाकडून कंपनीला येणे असलेल्या थकीत रकमेची माहिती घेतली आहे. कंपनीची मोठ्या प्रमाणात रक्कम शासनाकडे थकीत असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार तसेच इतर खर्च भागविण्यातही अडचणी येत असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्याचे मसुरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी-कणकवलीसाठी रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा
सावंतवाडी आणि कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन बसविण्यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन व मागणी करण्यात आली होती. त्यानुसार दोन्ही उपजिल्हा रुग्णालयांना सिटीस्कॅन मशीन मंजूर करण्यात आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील सर्व ५७ सिटीस्कॅन केंद्रांची शासनाकडे थकीत असलेली रक्कम तातडीने मिळवून देण्यासाठी प्रदेश भाजप अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राजू मसुरकर यांनी केली आहे.
रवींद्र चव्हाण यांना निवेदन व ई-मेल
कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची शासनाकडून येणे असलेली कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम तातडीने अदा करण्यात यावी, यासाठी रवींद्र चव्हाण यांना निवेदन देतानाच ई-मेलद्वारेही विनंती करण्यात आली आहे. थकीत बिलाचा प्रश्न मार्गी लागल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅनची सुविधा पुन्हा मोफत उपलब्ध होण्यास मदत होईल आणि गोरगरीब रुग्णांवर होणारा आर्थिक भार कमी होईल, असे मसुरकर यांनी स्पष्ट केले.
या मागणीची दखल घेत रवींद्र चव्हाण यांनी या विषयात जातीनिशी लक्ष घालून शासनाकडून कृष्णा कंपनीची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांना दिले आहे.
गोरगरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयात सिटीस्कॅनसाठी पुन्हा खासगी पद्धतीने पैसे मोजावे लागू नयेत, यासाठी शासनाने तातडीने थकीत रक्कम अदा करून सिटीस्कॅन सेवा पूर्ववत मोफत करावी, अशी आग्रही मागणी राजू मसुरकर यांनी केली आहे.
