You are currently viewing फोंडाघाटच्या वाट्याला आलेल्या संधी गेल्या; श्री. नरेंद्र महाराजांचे तीर्थक्षेत्रही नाणीजला

फोंडाघाटच्या वाट्याला आलेल्या संधी गेल्या; श्री. नरेंद्र महाराजांचे तीर्थक्षेत्रही नाणीजला

फोंडाघाटच्या वाट्याला आलेल्या संधी गेल्या; श्री. नरेंद्र महाराजांचे तीर्थक्षेत्रही नाणीजला

घाटाच्या पायथ्याशी जागा निवडली होती; जागा व सुविधा देण्याची तयारी असूनही प्रकल्प फोंडाघाटातून गेला

फोंडाघाट :

फोंडाघाट परिसराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक मोठ्या संधी यापूर्वीही हातातून गेल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची संधी म्हणजे श्री. नरेंद्र महाराजांचे फोंडाघाट येथे प्रस्तावित असलेले तीर्थक्षेत्र. श्री. नरेंद्र महाराज फोंडाघाट येथे प्रथम आले असता त्यांनी घाटाच्या पायथ्याशी जागेची पाहणी करून ती निवडली होती, अशी आठवण स्थानिकांकडून सांगितली जाते.
त्यावेळी महाराजांना पहिली ट्रॅक्स देण्यात आली होती. तसेच वैश्य समाजाचे तत्कालीन चेअरमन दादा कोरगावकर यांनी कर्ज मंजूर केल्याचेही सांगितले जाते. मात्र, त्यानंतर श्री. नरेंद्र महाराज यांनी नाणीज येथे जागा निवडली आणि पुढे तेथे भव्य तीर्थक्षेत्र साकारले.
हा प्रकल्प फोंडाघाटमध्ये झाला असता तर आज या परिसराचे चित्रच वेगळे असते, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. घाटाच्या पायथ्याशी तीर्थक्षेत्र उभे राहिल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा वाढली असती. त्यातून व्यापार-उदिमाला चालना मिळण्याबरोबरच रिक्षा व्यवसाय, नारळ-अगरबत्ती विक्री, हॉटेल व्यवसाय तसेच विविध स्टॉलच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या.
विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी लिंग्रस आणि भिरवंडेकर कुटुंबीयांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली होती, अशी माहितीही यानिमित्ताने समोर येत आहे. त्यामुळे फोंडाघाटच्या विकासासाठी मिळालेली ही संधी हातातून गेल्याची खंत आजही स्थानिकांच्या मनात आहे.
फोंडाघाटमधून यापूर्वीही अशा अनेक संधी निघून गेल्या आहेत. आता परिसराच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या मागणीसाठी पुन्हा एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे. काळ कोणासाठीही थांबत नाही, त्यामुळे उपलब्ध संधींचे महत्त्व ओळखून भविष्यातील विकासासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
‘कालाय तस्मै नमः’ — काळ कोणालाही थांबवत नाही; मात्र भविष्यातील संधी फोंडाघाटच्या हातून जाऊ नयेत, यासाठी आता जागरूक होण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा