You are currently viewing विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’

विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’

वेंगुर्ल्यात ६ सप्टेंबरला रंगणार ‘रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन’

वेंगुर्ला :

निसर्ग आणि मानवाचे पुरातन नाते अधिक दृढ करण्यासाठी, तसेच पारंपरिक रानभाज्यांची चव, महत्त्व आणि आरोग्यदायी गुणधर्मांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ अंतर्गत भव्य ‘रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. ‘माझा वेंगुर्ला’, ‘इन्स्टिट्यूट क्लब ऑफ वेंगुर्ला’ आणि ‘हिरकणी महिला शहरस्तर संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही अनोखी पाककला स्पर्धा रविवार, ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून सिद्धिविनायक मंगल कार्यालय, भटवाडी, वेंगुर्ला येथे होणार आहे. स्थानिक खाद्यसंस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने आयोजित या स्पर्धेत सहभागी महिलांना निसर्गात सहज मिळणाऱ्या रानभाज्यांपासून स्वादिष्ट व आरोग्यदायी पदार्थ तयार करायचे आहेत.

या पाककृतीमध्ये फोडशी, तांदुळजा, घोळ, भारंगी, करडू, फागला, पेवा, टाकळा, कुडा, केना, पुर्ननवा, सोनारवेल, आडाळा, भुईआवळा, आघाडा, घोटवेल अशा रानभाज्यांचाच वापर करणे अनिवार्य आहे. पारंपरिक पाककृतींना आधुनिक सादरीकरणाची जोड देऊन आपली कला दाखवण्याची संधी या माध्यमातून महिलांना मिळणार आहे.

स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असून, उर्वरित सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येईल. तसेच एका भव्य लकी ड्रॉच्या माध्यमातून स्पर्धकांना अतिरिक्त भेटवस्तू जिंकण्याची विशेष संधी मिळणार आहे.

स्पर्धेच्या नियमानुसार तयार करण्यात येणारी पाककृती आरोग्यास हानिकारक ठरणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित स्पर्धकाची राहील. स्पर्धकांनी पूर्ण भरलेली प्रवेशिका स्पर्धेच्या वेळी आयोजकांकडे जमा करणे आवश्यक असून, त्यामध्ये पाककृतीची संपूर्ण कृती सुवाच्य अक्षरात लिहिणे बंधनकारक आहे.

या स्पर्धेची प्रवेशिका ‘राजश्री कोल्ड्रिंक्स, वेंगुर्ला’ येथे उपलब्ध आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी ज्योती देसाई (९४२०२५८७७७), राजन (९४२३३०१३१०), यासिर (७०८३२२२४२२) आणि खेमराज (८४२१६९९७९७) यांच्याशी संपर्क साधावा.

रानभाज्यांची चव, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि आरोग्यदायी आहाराचा अनोखा संगम असलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा