You are currently viewing त्रिंबक येथील हरिश्चंद्र परब यांना गेल्या चार महिन्यापासून सातबारा,आठ-अ, फेरफार देण्यास महसूल विभागाकडून टाळाटाळ

त्रिंबक येथील हरिश्चंद्र परब यांना गेल्या चार महिन्यापासून सातबारा,आठ-अ, फेरफार देण्यास महसूल विभागाकडून टाळाटाळ

*त्रिंबक येथील हरिश्चंद्र परब यांना गेल्या चार महिन्यापासून सातबारा,आठ-अ, फेरफार देण्यास महसूल विभागाकडून टाळाटाळ*

*हरिश्चंद्र परब यांच्यासारख्या जिल्ह्यातील अनेक नागरिकांची महसूल संबंधित प्रकरणे प्रलंबित*

*मा.आ. वैभव नाईक यांचे शासन आपल्या दारी आणि महसूल समाधान शिबीरावर टीकास्त्र*

मालवण तालुक्यातील त्रिंबक देऊळवाडी येथील हरिश्चंद्र लाडोबा परब हे गेले ४ महिन्यापासून त्रिंबक तलाठी यांच्या जवळ आपल्या जमिनीचा सातबारा, आठ-अ, आणि फेरफार मागत आहेत.परंतु त्रिंबक तलाठी यांनी अद्याप पर्यंत त्यांना सातबारा,आठ-अ, फेरफार दिलेला नाही. त्याबाबतची तक्रार त्यांनी कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्याकडे केल्यानंतर, वैभव नाईक यांनी याबाबत आवाज उठविला असून राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी व महसूल समाधान शिबीरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे.

यावेळी वैभव नाईक म्हणाले, मालवण तालुक्यातील त्रिंबक देऊळवाडी येथील हरिश्चंद्र लाडोबा परब हे सामान्य शेतकरी आहेत त्यांचे वय ८२ वर्षे असून त्याची जमीन दुसऱ्याच्या नावावर झाल्याचा त्यांना संशय आहे.त्यामुळे गेले ४ महिन्यापासून त्रिंबक तलाठी यांच्या जवळ आपल्या जमिनीचा सातबारा, आठ-अ, आणि फेरफार ते मागत आहेत. परंतु त्यांना अद्याप पर्यंत सातबारा, आठ-अ, मिळालेले नाहीत. ते माझ्याकडे १५ दिवसापूर्वी आले होते तेव्हा मी त्रिंबक तलाठी यांना फोन करून त्यांना आवश्यक असलेले कागदपत्रे देण्यास सांगितले होते. तरीही त्रिंबक तलाठी आज देतो, उद्या देतो असे सांगुन त्यांनी यावर दुर्लक्ष केले आहे.
एकीकडे महायुती सरकार शासन आपल्या दारी, त्याचबरोबर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत विशेष महसूल समाधान शिबीर आयोजित करत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे समाधान शिबीराला उपस्थिती दर्शवत आहेत. मात्र हरिश्चंद्र परब यांच्या सारख्या सामान्य माणसाला चार-चार महिने सातबारा, आठ-अ, मिळत नसतील तर महायुती सरकारची हि शिबिरे काय कामाची आहेत? केवळ फोटोसेशन साठी ही शिबिरे घेतली जातात का? हरिश्चंद्र परब यांच्यासारखे अनेक नागरिक आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत ज्यांच्या महसूल विभागात फेरफार नोंदी, वारस तपास प्रकरणे, सातबारा दुरुस्तीची प्रकरणे ,जातीचे दाखले, त्याचबरोबर भूमी अभिलेख मध्ये जमिनीचे नकाशे व जमीन मोजणीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहेत. पैसे दिल्याशिवाय कोणताही दस्तऐवज नागरिकांना मिळत नाही. हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे.त्यामुळे कुडाळ मालवण मधील ज्यांची महसूल विषयक प्रकरणे प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी आता मी स्वतः कुडाळ आणि मालवण प्रांताधिकारी यांची वेळ घेऊन एकत्रित बैठक लावणार आहे. लवकरच याची तारीख मी जाहीर करेन असे कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा