कुडाळ-मालवणची आरोग्य व्यवस्था डॉक्टर-तज्ज्ञांअभावी व्हेंटिलेटरवर!
महिला बाल रुग्णालय व मालवण ग्रामीण रुग्णालयाची आमदार निलेश राणेंनी ऑन-फिल्ड पाहणी करावी : मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर
कुडाळ :
कुडाळ-मालवण तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था डॉक्टर व तज्ज्ञांच्या कमतरतेमुळे अडचणीत आली असून, सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीकडे स्थानिक आमदार निलेश राणे यांनी गांभीर्याने लक्ष देऊन शासकीय रुग्णालयांची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्न आमदार निलेश राणे आक्रमकपणे मांडताना दिसतात. तसेच सिंधुदुर्गातील पर्यटन व उद्योगवाढीसाठी विविध मंत्र्यांच्या दालनात भेटीगाठी घेत असल्याचेही दिसून येते. मात्र, कुडाळ-मालवणमधील आरोग्याच्या गंभीर प्रश्नांबाबत अपेक्षित आक्रमक भूमिका दिसून येत नसल्याचा आरोप किनळेकर यांनी केला आहे.
कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे मालवण ग्रामीण रुग्णालयातही तज्ज्ञ प्रसूती डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी सामान्य नागरिकांना नाईलाजाने खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत असून, त्यांच्यावर उपचाराचा आर्थिक भार पडत असल्याचे किनळेकर यांनी सांगितले.
या प्रश्नावर विरोधी पक्षांचे पदाधिकारी तसेच सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आवाज उठवूनही शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झालेले नाहीत, असा दावा त्यांनी केला.
विकासाची मोठी स्वप्ने दाखविताना सामान्य जनतेच्या मूलभूत आरोग्य सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, आमदार निलेश राणे यांनी कुडाळ महिला व बाल रुग्णालय तसेच मालवण ग्रामीण रुग्णालयाची एकदा तरी प्रत्यक्ष ऑन-फिल्ड पाहणी करून डॉक्टर व तज्ज्ञांची रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
