You are currently viewing वाट माहेराची

वाट माहेराची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

  *वाट माहेराची..*

 

माहेराची माडी बाई माहेराचे माडी ग

घुंगराची गाडी मला घ्यायला की आली ग..

 

खुळुखुळु वाजतात पायी माझ्या चाळ ग

किणकिण घंटानाद सर्जाराजा धावती

मनी माझ्या भाव कसे माहेराचे दाटती

वाट पाहतसे माय माझी किती किती गोड ग…

 

गाडी घेऊनिया आला बंधू माझा साजरा

सर्जाराजा धावती ग हाती आहे कासरा

खुडूखुडू दुडूदुडू नागमोडी वाट ती

झाडेफुले हिरवाई वृक्ष किती दाटती…

 

माय माझी दारातच पाहतसे वाटुली

लेक माझी अजून ती कशी नाही पोहचली

भाकरतुकडा हाती हेरझारा घालते

गाडी दिसे डोळ्याम्होरं खुदूखुदू हासते..

 

मायबापाचीती सर कुणालाच येईना

मन धावे माहेरात माघारीच जाईना

माहेराची माडी बाई माहेराची माडी ग..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा