सिंधुदुर्गात २४ ऑगस्टला ‘सेवा अभियान’
प्रलंबित विकासकामे, शासकीय कामे व नागरिकांच्या समस्यांबाबत स्वीकारणार निवेदने; आमदार प्रमोद जठार प्रमुख उपस्थित
सावंतवाडी :
प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रलंबित विकासकामे, विविध समस्या, शासकीय कामे तसेच मूलभूत सुविधांशी संबंधित निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत.
सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत काझी शहाबुद्दीन सभागृह, सावंतवाडी येथे हे अभियान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास आमदार प्रमोद जठार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या ज्या समस्या अथवा विकासकामे प्रलंबित आहेत, त्याबाबतची माहिती व निवेदने या अभियानाच्या माध्यमातून मांडता येणार आहेत. संबंधित गावातील नागरिकांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या प्रश्नांचा प्रभावीपणे पाठपुरावा व्हावा, या उद्देशाने हे अभियान आयोजित करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर त्या-त्या गावातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांसह मोठ्या संख्येने सेवा अभियानास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या आवाहनानुसार सर्व मंडल अध्यक्ष, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना या अभियानाची माहिती देऊन त्यांच्या प्रलंबित प्रश्नांसह दि. २४ ऑगस्ट रोजी काझी शहाबुद्दीन सभागृह, सावंतवाडी येथे उपस्थित राहण्यासाठी आवाहन करावे, असे भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी केले आहे.
