डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत
सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : “प्रकाशन व्यवसायाला उतरती कळा लागलेली असतानाही प्रकाशक भास्कर पाटील आणि सहयोगी प्रकाशिका मनीषा रायजादे-पाटील यांनी अवघ्या एका वर्षात भक्ती प्रकाशनच्या माध्यमातून दहा पुस्तके प्रकाशित केली. वाचन संस्कृती टिकविण्यासाठी वर्धापनदिनाचे औचित्य साधून साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. लेखकाने निर्भय होऊन वास्तव लिहिले पाहिजे. गुळगुळीत आणि केवळ प्रेमकविता लिहिण्यापेक्षा समाजातील दुःख, वेदना आणि प्रश्न शब्दबद्ध झाले पाहिजेत,” असे परखड मत ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
सांगलीच्या ऐतिहासिक नगर वाचनालयाच्या ज्ञानप्रांगणात भक्ती प्रकाशनच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘पहिले अक्षरलेणी साहित्य संमेलन, सांगली २०२६’ उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडले. यावेळी बोलताना डॉ. सबनीस यांनी समकालीन साहित्य, राजकारण, धर्मकारण, शेतकरी आणि वाचन संस्कृतीवर परखड भाष्य केले.
“सध्याचे राजकारण आणि धर्मकारण गढूळ झाले असून सर्वत्र एक प्रकारची दहशत आहे. अशा परिस्थितीत लेखक निर्भय झाला तरच तो चांगले लिहू शकतो,” असे सांगत त्यांनी समाजातील ज्वलंत प्रश्न साहित्याच्या केंद्रस्थानी आणण्याचे आवाहन केले.
दिल्लीतील आंदोलनाचा संदर्भ देताना डॉ. सबनीस म्हणाले, “तरुणांचे आंदोलन क्रांतिकारी होते; मात्र त्या तरुणांवर कविता का येत नाही? लेखकांचा अभिजीत दीपके हा नायक का होत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. साहित्याने वर्तमानातील घडामोडींना भिडले पाहिजे आणि समाजमनातील अस्वस्थता शब्दबद्ध केली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी प्रश्नावर भाष्य करताना ते म्हणाले, “शेतकऱ्याचे दुःख आणि वेदना लेखकांनी मांडल्या पाहिजेत; मात्र समाजानेही डोळे उघडे ठेवून ते पाहिले पाहिजे. शेतकऱ्याच्या मुलांना आता पोरी मिळत नाहीत. शेतकऱ्याचे अर्थशास्त्र लेखकांनी मांडले पाहिजे; ते मांडणारा अजून जन्माला आलेला नाही, मी त्याची वाट पाहतोय.” शेतकऱ्याला ‘राजा’ म्हटले जाते; प्रत्यक्षात मात्र तो आर्थिक संकटात सापडला आहे. सरकार कोणाचेही असले तरी शेतकऱ्याचे प्रश्न कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारच्या ‘घर तिरंगा’ उपक्रमाचा संदर्भ देत डॉ. सबनीस यांनी “प्रत्येक घरात तिरंगा पोहोचवण्याबरोबरच प्रत्येक घरात संविधान पोहोचवले पाहिजे,” असे मत व्यक्त केले. भक्ती प्रकाशनने अल्पावधीत केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्याचे आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या साहित्य सोहळ्याला स्वागताध्यक्ष प्रा. संजय ठिगळे, उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक मा. दि. बा. पाटील (कामेरी), प्रमुख अतिथी मा. दयासागर बन्ने, लेखक-पत्रकार प्रा. महादेव रोकडे, कथाकार ॲड. कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटक दि. बा. पाटील यांनी साहित्य आणि वाचन संस्कृतीच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. स्वागताध्यक्ष प्रा. संजय ठिगळे यांनी साहित्यिक चळवळीला अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. दयासागर बन्ने यांच्या विचारांनीही उपस्थित रसिकांना वैचारिक ऊर्जा दिली.
लेखक-पत्रकार प्रा. महादेव रोकडे आणि कथाकार ॲड. कृष्णा पाटील यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. तसेच प्रा. सुभाष कवडे यांची कवयित्री मनीषा पाटील हरोलीकर यांनी घेतलेली प्रकट मुलाखत हा कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरला.
यावेळी बोलताना ॲड. कृष्णा पाटील यांनी मराठी भाषेच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. “आपल्या समाजाला मराठी भाषेचे प्रेम कमी होत चालले आहे. मुलांचा मराठी भाषेविषयीचा आपलेपणा कमी होत आहे. मराठी ही आपली आई आणि मातृभाषा आहे; त्यामुळे ती जपलीच पाहिजे. इंग्रजी शिकण्याला आमचा विरोध नाही; मात्र पहिला पर्याय मराठी भाषेलाच असला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू झालेले भक्ती प्रकाशनचे रोपटे अवघ्या एका वर्षात दहा पुस्तकांच्या प्रकाशनापर्यंत पोहोचले. त्याच कार्याचा प्रथम वर्धापनदिन साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. नगर वाचनालयाचे ज्ञानप्रांगण दोनशेहून अधिक साहित्यप्रेमी, कवी आणि रसिक वाचकांच्या उपस्थितीने गच्च भरले होते. मान्यवरांची वैचारिक मनोगते, पुस्तक प्रकाशन, प्रकट मुलाखत आणि साहित्यिक संवादामुळे संमेलनाला अक्षरशः अक्षरांचा उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.
भक्ती प्रकाशनचे प्रकाशक भास्कर पाटील आणि सहयोगी प्रकाशिका मनीषा रायजादे-पाटील यांच्या निमंत्रणातून साकारलेल्या या संमेलनाने सांगलीच्या साहित्यिक विश्वात नव्या उपक्रमाची नोंद केली.
