शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगावच्या कुमारी दुर्वा धुरी हिचा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
साळगाव :
शिक्षण प्रसारक मंडळ झराप पंचक्रोशी साळगाव संचलित शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथील गुणवंत विद्यार्थिनी कुमारी दुर्वा निलेश धुरी हिने माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत व एन.एम.एम.एस.परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. नितेशजी राणे यांच्या हस्ते कुमारी दुर्वा धुरी हिचा गौरवपूर्वक सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रमोद कामत, जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
कुमारी दुर्वा हिने आपल्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे फलित शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून दाखवून दिले आहे. तिच्या या यशामुळे शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगावचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल झाले असून, तिच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
दुर्वाच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री. मुकुंद धुरी, संस्था सचिव श्री. प्रदीप प्रभूतेंडोलकर सर्व संस्था पदाधिकारी आणि मुख्याध्यापक श्री. सलीम तकीलदार यांनी तिचे विशेष अभिनंदन केले. तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग व विद्यार्थ्यांनीही तिच्या यशाचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कुमारी दुर्वा धुरी हिचे हे यश विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, “मेहनत, जिद्द आणि सातत्य यांना यशाची निश्चित साथ मिळते” याचा आदर्श तिने आपल्या कामगिरीतून निर्माण केला आहे.
