घरावर “जप्ती” आणत राष्ट्रीयकृत बँकेची “अनोखी मानवंदना” .. रामराज्य सावंतवाडीतला दुर्दैवी प्रकार सिंधूदुर्गवासीय रोखणार का?
आज सावंतवाडीत चराठा येथे एका राष्ट्रीयकृत बॅंकेची कर्जवसुलीसाठी घरावर जप्तीची मोहीम आहे. कर्ज घेतले तर ते फेडलेच पाहिजे ही साधारणत: कोकणातली मानसिकता, त्यामुळे लोकांचाही अशा प्रकाराकडे कानाडोळा असतो. आणि याचा बरोबर फायदा उचलत बँकांचे गैरप्रकार सुरू असतात. राष्ट्रीय बँका म्हणजे व्यवहार योग्यच असणार हे गृहीत धरले जाते, त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी एखाद्या खातेदाराच्या खात्यावरील ५४,०००/- रुपये लेखी किंवा तोंडी परवानगीशिवाय बेकायदा परस्पर अन्यत्र वळते केले तर? विश्वास बसत नाही ना?
या प्रकारामुळे हडबडलेल्या कर्जदाराची सगळीच आर्थिक परिस्थिती बिघडली. त्याला काहीच सुचेना. त्याने दाद मागण्याचा प्रयत्न केला, तर त्याची आणखीच मुस्कटदाबी करण्यासाठी जप्तीची कारवाई लावण्यात आली. कर्जदाराने पोलीस स्थानकात लेखी तक्रार नोंदवली, पण त्यापूर्वीच आज जप्ती लावून आपल्या पापावर पांघरूण घालण्याचा बँकेचा प्रयत्न चालला आहे.
दुर्दैव हे की सावंतवाडी चराठा येथील जप्ती आणत असलेल्या घरात कर्जदाराचे ८५ वर्षाचे वृद्ध वडील राहतात, जे निवृत्त सैनिक आहेत. देशासाठी चार लढाया ते लढलेत आणि वार्धक्यात चार समाधानाचे क्षण जगण्याच्या ऐवजी आज जप्तीच्या वेळी त्यांना राहत्या घरातून बाहेर काढले जाण्याची वेळ येणार आहे. हेच फळ काय मम तपाला असा प्रश्न पडेल आज त्यांना! बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याऐवजी चूक नसलेल्या कर्जदारावर आज चुकीची कारवाई होत आहे. महाराष्ट्र कर्जदार जामिनदार संघर्ष समितीचे कार्यकर्ते या प्रकाराविरोधात संतापले असून सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री राजेश साळगावकर यांनी जनतेच्या दरबारात या सैनिकाला न्यायासाठी मागणी करणार असल्याचे सांगितले आहे. सैनिकी वारशाची परंपरा असलेल्या रामराज्य सावंतवाडीत हा अन्याय रोखण्यासाठी आज कोण कोण पुढे येतील, याबद्दल निश्चितच औत्सुक्य आहे. असे गैरप्रकार रोखण्यासाठी आता जनतेनेच स्वयंस्फुर्तीने पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.