You are currently viewing ठरलं एकदाचं !!

ठरलं एकदाचं !!

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ११ एप्रिलपासून सुरू होणार

 

पुणे :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेवरुन निर्माण झालेला गोंधळ आता संपुष्टात आला आहे. विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा 11 एप्रिलपासून घेण्याचे निश्चित झाले आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीत परीक्षा एक महिना पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर आली आहे.

परीक्षा कशी होणार?

प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या बहुपर्यायी प्रश्‍न पद्धतीने 50 गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठाची स्वतःची एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशन ही कंपनी परीक्षा घेणार आहे.

पुणे विद्यापीठाची परीक्षा

मंडळाची बैठक बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. त्यामध्ये 15 मार्चपासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र परीक्षेचे काम जुन्याच एका एजन्सीला देणे नियमाला धरुन नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या 15 मार्चपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरु करणं शक्य नसल्याचं स्पष्ट झालं.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक

कोव्हिडच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या महाविद्यालये बंद असून ऑनलाईन क्लासेस सुरु आहे. अशा परिस्थितीत परीक्षा नेमक्या कशा घ्यायचा हा मोठा प्रश्न विद्यापीठ प्रशासनासमोर आहे. अशातच काल (मंगळवार) पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 11 एप्रिलपासून परीक्षा घेण्याचं निश्चित झालं.

विद्यार्थ्यांमधला संभ्रम दूर होणार

पुणे विद्यापीठाशी संलग्न तीनही जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील सुमारे साडे सहा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 मार्च ते 30 मार्चपासून सुरु करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र नव्या वेळापत्रकानुसार आता परीक्षा 11 एप्रिलला सुरु होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून परीक्षांबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. हा संभ्रम आता दूर झालेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा