You are currently viewing सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेनंतर विमा संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर

सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेनंतर विमा संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर

सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेनंतर विमा संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर

अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या प्रसंगी कुटुंबाला आर्थिक आधार; नागरिकांनी विमा कवच घेण्याचे राजू मसुरकर यांचे आवाहन

सावंतवाडी

सावंतवाडी : आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्यावर दोन दिवसांपूर्वी स्नान करत असताना कर्नाटक राज्यातील हम्पी परिसरातील एका पर्यटकाला पाण्यातील सर्पाने दंश केल्याची दुर्दैवी घटना घडली. सर्पदंश झाल्याचे सुरुवातीला लक्षात न आल्याने काही वेळानंतर संबंधित पर्यटकाला चक्कर येऊन डोळ्यांसमोर अंधुक दिसू लागले.
त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याला तातडीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे वैद्यकीय तपासणी करून आवश्यक औषधोपचार व इंजेक्शन देण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती अधिक गंभीर होऊन दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती सोशल मीडियावरून मिळाल्यानंतर जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृत व्यक्तीच्या मित्रमंडळी व नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली.
यावेळी मसुरकर यांनी सर्पदंशाच्या घटना घडल्यास नागरिकांनी विलंब न करता तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन केले. सर्पदंशानंतर प्राथमिक उपचारानंतर आवश्यक असल्यास तज्ज्ञ वैद्यकीय सुविधा असलेल्या मोठ्या रुग्णालयात रुग्णाला तातडीने हलविणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अपघाती मृत्यू व कायमस्वरूपी अपंगत्वासाठी विमा संरक्षणाचे आवाहन
दरम्यान, नागरिकांनी स्वतःसह आपल्या कुटुंबीयांसाठी अपघाती विमा संरक्षण घेण्याचे आवाहन राजू मसुरकर यांनी केले. सर्पदंश, वीज पडणे, उंचावरून किंवा दरीत पडणे, पाण्यात बुडणे तसेच अन्य अपघाती घटनांमध्ये मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विमा संरक्षणामुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.
पोस्ट कार्यालयामार्फत उपलब्ध असलेल्या अपघाती विमा योजनांची माहिती नागरिकांनी आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयातून घेऊन, पात्रता, प्रीमियम, विमा रक्कम व अटी तपासून विमा संरक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
“अचानक उद्भवणाऱ्या अपघाती संकटाच्या वेळी कुटुंबावर आर्थिक भार पडू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार करून योग्य विमा संरक्षण घेणे गरजेचे आहे,” असे मसुरकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा