पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
नवीन पदभार स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा; सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे पोलीस निरीक्षकांकडून कौतुक
सावंतवाडी :
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यानिमित्त सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक चव्हाण यांची नुकतीच बदली झाली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सावंतवाडी शहरात उत्कृष्टपणे सेवा बजावली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, सदस्य रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, रवी जाधव तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते लक्ष्मण कदम उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे सातत्याने पोलीस यंत्रणेला विविध उपक्रमांमध्ये सहकार्य करत आले आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय समाजातील गरजू घटकांना मदत करण्याबरोबरच विविध क्षेत्रांत प्रतिष्ठानकडून उल्लेखनीय सेवाभावी कार्य केले जाते. त्यामुळे शासकीय यंत्रणांसह समाजातील विविध घटकांकडूनही अडचणीच्या प्रसंगी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली जाते.
या भेटीदरम्यान पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. “निस्वार्थपणे समाजासाठी काम करणारे तुमचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्या संस्थेसोबत काम करायला मला नक्कीच आवडेल. तुम्हा सर्वांना भेटून खूप बरं वाटलं,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या भेटीमुळे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि पोलीस यंत्रणा यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
