*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके यांच्या “गेले द्यायचे राहुनी” या काव्यसंग्रहाचे डाॅ.राजेंद्र कोबरणे यांनी केलेलं परीक्षण*
*आत्मडोहातून झिरपणारा मौनी पाझर म्हणजे…*
*” गेले द्यायचे राहुनी “*
प्रज्ञा घोडके यांचा ” गेले द्यायचे राहुनी ” हा काव्यसंग्रह त्यांच्या संग्रहाचे आठवे अपत्य आहे.त्याचे बारकाईने वाचन केले असता हा संग्रह त्याच्या आत्मडोहातून वाचकाच्या आत्म्याशी संवाद करतो असे वाटते.संवाद करत करत तो स्वतःच्याच मनापर्यंत झिरपत जाऊन पाझरायला लागतो.
यातून त्याचे मौन सुटून वाचक व कवितेचा आत्मा यांचा संवाद सुरू होतो.इतका विलक्षण अनुभव हा कवितासंग्रह देतो व वाचक प्रत्येक कवितेचा होऊन जातो.
” गेले द्यायचे राहुनी ” हे शीर्षकच मुळी भुरळ पाडणारे आहे.
संग्रहातील प्रत्येक कवितेच्या मुळाशी या शीर्षकाचे तत्व कवयित्रीने घट्ट बांधल्याचे जाणवते.
कवयित्रीच्या अक्षरवेलीवरची
व जीवन वाटेवरची यात्रा परिपक्व झालेली असतानाही साहित्य अक्षरांना व मानवाला माझ्याकडून काही द्यायचे राहून गेले ही कवयित्रीची संवेदना या संग्रहातील प्रत्येक रचनेतून व्यक्त होते,असे मला वाटते.कवयित्री पुणे येथील शिक्षण संचालनालयात सेवेत असताना मोठी जबाबदारी,तसेच जरासे अस्थिव्यंग व सुक्ष्म नेत्रविकार असूनही त्यांची अक्षरे मनाच्या सुसाट धावणार्या यानातून चौफेर पाठविण्याचे व काळजाचा ठाव घेण्याचे कसब त्यांच्या प्रत्येक काव्यात दिसून येते.
” गेले द्यायचे राहुनी ” हा काव्यविष्कार म्हणजे कवयित्रीच्या सुखदुःखांचा,विचारांचा, मूल्यांचा,संयम व सबुरीचा,नितळ प्रेमाचा,
भूत-वर्तमान-भविष्य
या जीवनव्यवहारातील घडामोडींचा, दैवीश्रध्देचा अक्षरडोह आहे.अक्षरडोह की आत्मडोह अशा अद्वैतामधून प्रत्येक कविता कवयित्रीच्याच मौनातून पाझरत जाते.
” गाणे ओठात राहीले
गेले गायचे राहून,
देणे तुझेच जन्माचे
गेले द्यायचे राहून ”
ओठातून गाणे पोटातच राहून तुझ्या जन्मभराचे देणे द्यायचेच राहून गेले.
ही जोडीदाराजवळ अव्यक्त राहिलेली मनातली खंत कवयित्री पानात व्यक्त करते.
आनंदाच्या पलिकडे व दुःखाच्या अलिकडे या दोन परिमाणांच्या मध्ये असणाऱ्या पोकळीमध्ये अस्वस्थतेचे बीज असते म्हणून आनंद व दुःख या दोन परिमाणांचा जन्म अस्वस्थतेच्या बीजातून होत असतो,हे सांगताना कवयित्री म्हणते,
” आनंदाच्या पलिकडे
दुःखाच्याही अलिकडे
मग बरेच काहीसे
असे उदासीच्या पुढे ”
गणितातील समांतर रेषांच्या गुणधर्मीय प्रतिकांचा वापर करत त्याग,दुरावा,संयम,या प्रतिमा नितळ व अतुट प्रेमाच्या निदर्शक आहेत व हीच खऱ्या प्रेमाची व्याख्या सांगायची राहून गेली हे सांगताना कवयित्री म्हणते…
” दोन समांतर रेषा
कधी कोठे भेटतात
परि एकमेकांवर जीव
अंथरत राहतात. ”
उर्जेची सत्यम,शिवम,सुंदरम हीच रूपे आहेत.या रुपांचा उर्जास्रोत दिनकरालाही विसरून कसे चालेल ? हे सोप्या शब्दात मांडताना कवयित्री म्हणते…
” दिनकरा विना सांगा
कोण देईल प्रकाश
तोच असे खरा सार्या
सार्थ जगाचा विश्वास ”
मुळात अवघ्या कवितासंग्रहाची गुप्त लिपी मौनात व्यक्त होते.त्यामुळे त्यात विषमता,दारिद्रय,चंगळवाद,अत्याचार,भ्रष्टाचार, हे विषय समाविष्ट नाहीत.मुळात कवितेला आत्मसंवादाचे आणि मौनाचे कुंपण असल्याने ती कृष्णामाईसारखी संथ वाहते.
संवेदनशीलतेची, सौजन्यशीलतेची व सहिष्णूतेची हिरवी झालर पांघरून सात्विक नजरेने ती मानवाकडे पाहते.सकारात्मक भावाने सांत्वन करून धीर देताना म्हणते की…
” संपलेल्या आशांचेही
श्वास भरूनिया घ्यावे
विरलेल्या शब्दांनाही
पुन्हा ठळक करावे.”
लोण्यासारखे मृदू मुलायम, चंद्रासारखे शांत शितल व गंगेसारखे पवित्र निर्मळ अक्षरे कवितेसाठी सज्ज झाल्याने हा कवितासंग्रह अंतर्मुख वाचकाच्याच पसंतीस उतरेल.कदाचित मस्त कलंदर बिनधास्त अशा बहिर्मुख वाचकाला तो कंटाळवाणा ठरण्याची शक्यता वाटते.भुतलावरील लावण्यवतीच्या पैंजणधूनीच्या प्रेमात चंद्र पडल्याने त्याला स्वप्नभूल होते व तो त्याची वाटच विसरतो,हे प्रेमाचे अनोखे सौंदर्य व्यक्त करताना ओठांपलीकडले आकाश कवेत घेऊन कवयित्री म्हणते…
” चंद्र विसरतो वाट
चालताना अंगणात
साज वाजता पाऊली
बोले पैंजण प्रेमात ”
कवयित्रीला तिच्या साठोत्तरी जीवनाच्या उंबरठ्यावर असताना तिला तिच्या काळजात कोंडलेल्या स्वकीयांच्या भेटीच्या ओढीची खंत आहे.तिला केवळ जोडीदारालाच नव्हे तर समस्त जनांना भेटावयाचे राहून गेले आहे.म्हणून ती म्हणते…
” उन्हे कलता सांजेला
अंधारात बुडालेली,
ओढ आपुल्या भेटीची
काळजात कोंडलेली.”
येथे ओढ तुझिया भेटीची ऐवजी तिने आपुल्या भेटीची हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला आहे,असे वाटते.
मुखपृष्ठकार सॅम चव्हाण यांनी मुखपृष्ठावर पानगळ रेखाटताना फेर नवतारुण्याचा आभास होण्यासाठी जसे त्याला विसाव्याची गरज असते,तशी समस्त मानवालाही असते,यासाठी मुखपृष्ठकाराने कवयित्रीच्या खालील ओळींचा आधार घेतला असावा असे वाटते….
” जेव्हा गरज वृक्षाला
असे जरा विसाव्याची,
नवतारुण्य फुलण्या
पानगळ गरजेची.”
याचाच अर्थ नवतारूण्याच्या उर्जेसाठी मला विसाव्याची गरज असते हे कवयित्रीला सांगायचे राहून गेले आहे. शिवाय मुखपृष्ठावरील ग्रीष्म ॠतूतही झाडावर फुललेला, लाल गुलाबी केशर रंगांच्या गुलमोहरासम फुलांचा बहर व आकाशात दाटून आलेले मेघोळ मुखपृष्ठकाराने सचित्र केले आहे.यातून कठीण प्रसंगातही अश्रूंची व्हावी फुले यासाठी उद्याचा पाऊस पडेल ही संग्रहाची अक्षरमागणी अधोरेखित करण्यात मुखपृष्ठकार यशस्वी झालेला आहे.
जे द्यायचे व सांगावयाचे राहून गेले,ते देण्यासाठी, सांगण्यासाठी व करण्यासाठी आपण सर्वजण कवयित्रीला शुभेच्छा देऊ या.
आत्मडोहातून झिरपणारा हा मौनी पाझर प्रत्येक वाचकाच्या उंबरठ्यात नक्की जाऊन पोहोचेल,अशी सदिच्छा.
डाॅ.राजेंद्र कोबरणे
( सेवानिवृत्त प्राचार्य )
कवयित्री- सौ.प्रज्ञा घोडके,
प्रकाशक-परिस पब्लिकेशन, सासवड,जि.पुणे.
समीक्षण-डाॅ.राजेंद्र कोबरणे.
( सेवानिवृत्त प्राचार्य )
राहुरीफॅक्टरी
मोबा.-8208923542
