सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३५ व्या वर्धापन दिनी कर्मचाऱ्यांसाठी मोफत विमा, सभासदांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचा शुभारंभ
पी. एफ. डॉन्टस शिष्यवृत्ती योजनेची घोषणा; ठेव उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या कर्मचारी व पिग्मी एजंटांचा विशेष सन्मान
सावंतवाडी | प्रतिनिधी :
सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेला ३५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ५ ऑगस्ट रोजी संस्थेतर्फे विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ आणि विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ या दोन्ही योजनांचा लाभ पूर्णपणे मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या योजनांमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास २ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास २ लाख रुपये, तर अंशतः अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांची विमा रक्कम देण्यात येणार आहे.
याचवेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ‘सहकाररत्न’ कै. पी. एफ. डॉन्टस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सभासदांच्या पाल्यांसाठी ‘सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस शिष्यवृत्ती योजना’ सुरू करण्यात आली. पोस्ट ग्रॅज्युएशन, परदेशी शिक्षण, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यश तसेच एनडीएमध्ये निवड झालेल्या सभासदांच्या पाल्यांना या योजनेअंतर्गत प्रत्येकी १५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
दरम्यान, स्थापना दिनानिमित्त ओरोस येथील ‘आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन’ येथे ठेव उद्दिष्ट पूर्ती सन्मान सोहळा पार पडला. गतवर्षी निश्चित करण्यात आलेले ठेव उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या कर्मचारी व पिग्मी एजंटांचा रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
कर्मचारी गटात सौ. ज्योती प्रसन्ना देसाई (प्रथम – १ लाख रुपये), श्री. राजन बाळकृष्ण राऊळ (द्वितीय – ७५ हजार रुपये), सौ. मधुरा महेश रावराणे (तृतीय – ५० हजार रुपये), सौ. मंगल विश्वासराव देसाई (चतुर्थ – २५ हजार रुपये) आणि सौ. पूर्णा पराग हिंदळेकर (पंचम – २० हजार रुपये) यांचा सन्मान करण्यात आला. पिग्मी एजंट गटात श्रद्धा बांदेकर (प्रथम – ५० हजार रुपये) आणि सौ. निकिता नयन वराडकर (द्वितीय – ४० हजार रुपये) यांनाही गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी केले. चेअरमन बाबुराव कविटकर, संचालक सुभाष सावंत आणि चंद्रशेखर जोशी यांनी मार्गदर्शन केले. कर्मचारी प्रतिनिधी म्हणून ज्योती देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उपकार्यकारी अधिकारी प्रल्हाद तावडे यांनी केले, तर आभार साधना बागवे यांनी मानले. यावेळी व्हाईस चेअरमन चंद्रकांत शिरसाट, संचालक भिवा गावडे, गोपाळ बाईत यांच्यासह संस्थेचे अधिकारी, कर्मचारी आणि पिग्मी एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
