You are currently viewing पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचा मसुदा जाहीर; सिंधुदुर्गातील १९८ गावांचा प्रस्तावित समावेश

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचा मसुदा जाहीर; सिंधुदुर्गातील १९८ गावांचा प्रस्तावित समावेश

हरकती व सूचना सादर करण्यासाठी ६० दिवसांची मुदत; नागरिक, ग्रामस्थ व संस्थांना केंद्र शासनाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने पश्चिम घाट परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी २७ जुलै २०२६ रोजी मसुदा अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना https://egazette.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या मसुदा अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांमधील २ हजार ५१५ गावांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या पाच तालुक्यांतील १९८ गावांचा समावेश प्रस्तावित आहे.

या प्रस्तावित अधिसूचनेमुळे पर्यावरण संरक्षणाला अधिक बळ मिळणार असले तरी स्थानिक पातळीवर त्याचे विविध परिणाम होणारे आहे. स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, संस्था तसेच संबंधित भागधारकांनी पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ व त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियमांनुसार अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत आपल्या हरकती अथवा सूचना केंद्र शासनाकडे सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

हरकती व सूचना पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली – ११०००३ या पत्त्यावर टपालाद्वारे किंवा esz-mef@nic.in या ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा