पतंजली परिवारातर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात; होम-हवनासह गुरुंना वंदन
सावंतवाडीत योगसाधकांचा सहभाग; ज्येष्ठ योगकर्मी दत्ताराम सडेकर दांपत्याचा विशेष सत्कार
सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली परिवारातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त पतंजली योगवर्ग, वैश्यवाडा, सावंतवाडी येथे होम-हवन करून गुरुंना वंदन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा कार्यक्रम भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. बाबली गवंडे यांनी विधिवत होम-हवन केले.
यावेळी पतंजली योग समितीचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रभारी विद्याधर पाटणकर, सहजिल्हाप्रभारी दत्तात्रेय निखार्गे, भारत स्वाभिमान जिल्हा पूर्वप्रभारी महेश भाट, किसान सेवा समिती जिल्हाप्रभारी सुभाष गोवेकर, ज्येष्ठ योगकर्मी दत्ताराम सडेकर व सौ. सडेकर, सोशल मीडिया जिल्हाप्रभारी योगेश येरम, ज्येष्ठ योगशिक्षक दिलीप भाईप, पतंजली योग समिती सावंतवाडी तहसील प्रभारी बाबली गवंडे, सोशल मीडिया तहसील प्रभारी लक्ष्मण राणे, किसान सेवा समिती तहसील प्रभारी नारायण राणे, ज्येष्ठ योगशिक्षिका डॉ. रोहिणी बांदेकर, सौ. अपर्णा भाईप, महिला पतंजली सावंतवाडी तहसील संघटनमंत्री सौ. मृणाली गवंडे, कोषाध्यक्ष सौ. श्रद्धा सावंत, सहयोगशिक्षक संजय म्हापसेकर, संदीप पाटे, डॉ. समता धुरी, योगसाधक तुकाराम कुमठेकर, पूजा शिरसाट, राधिका मुंज यांच्यासह अनेक योगसाधक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रभारी विद्याधर पाटणकर यांनी गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करत उपस्थितांना योगमार्गावर निष्ठेने कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गेली २५ वर्षे निस्वार्थ भावनेने योगप्रचार व योगप्रसारासाठी सातत्याने कार्य करणारे ज्येष्ठ योगकर्मी दत्ताराम सडेकर आणि सौ. सडेकर या दांपत्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा महिला पतंजली समिती सावंतवाडीच्या वतीने पोलिस लाईन हॉल, सावंतवाडी येथेही गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिला योगसाधकांनी योगनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच महिला पतंजली सावंतवाडी तहसील संघटनमंत्री सौ. मृणाली गवंडे यांनी विशेष योगवर्ग घेऊन उपस्थित महिलांना योगाचे महत्त्व आणि नियमित साधनेचे मार्गदर्शन केले.
