*जागतिक साकव्य विकास मंच तथा महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कवी कालिदास* ( वनहरिणी ८+८+८+८)
भावविश्व अन् सृजनशीलता कल्पकतेचा शब्दपुजारी
साहित्याची ज्योत लावली रसिकजनांच्या मनगाभारी
मेघ नभातुन करती वृष्टी काव्यवैभव जया लाभले
कविराजाच्या प्रतिमेपुढती विनम्र होऊन पुष्प वाहिले
विद्वत्ता अन् प्रेम रसिकता मिलाफ सुंदर असा जाहला
काव्यामध्ये करुणेला अन् शृंगाराला सहज फुलवला
कोमल प्रीती शकुंतलेची भावभावना फुलुनी आली
मेघदुतातुन विरहाचीही भाषा सारे कथुनी गेली
कुमारसंभव काव्यातुनिया शिवशक्तीचा गौरव झाला
रघुवंशाच्या ओव्यांमधुनी निष्ठा मूल्ये महिमा दिसला
उपमा ज्याच्या अजोड असती साहित्याच्या क्षेत्रामध्ये
तोड न त्याच्या कवित्वास या कनिष्ठिकेवर अंगुलिमध्ये
एकमेव हा कवी अलौकिक युगायुगांचा मान लाभला
वाङमय जगती उजळुन येता भारतवासी बघा तोषला
जग ओळखते भारतासही अमर तयाच्या कर्तृत्वाने
स्मरण करूया आपण सारे आदर आणिक सद्भावाने
आषाढाच्या पहिल्या दिवशी करू साजरी चला जयंती
कविवर्याला वंदन करुनी जपू तयाची चिरंतन स्मृती
©️®️ डॉ मानसी पाटील
