महाराष्ट्र राज्य सरकारच्या सन २०२१-२२ या वर्षाच्या आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या शासकीय मेडिकल कॉलेजसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेजच्या कामाला आता गती मिळणार आहे. जिल्ह्यातील महत्वाकांक्षी असलेल्या सिंधु-रत्न योजनेसाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून नवनवीन उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच चांदा ते बांदा योजनेतील जे प्रलंबित प्रस्ताव होते ते आता या निधीतुन मार्गी लागणार आहेत.
सिंधुदुर्ग मध्ये पर्यटन विकासासाठी आणि मच्छिमारांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. बसस्थानकांची जी कामे अपूर्ण आहेत त्यासाठी देखील निधीची तरतूद केली आहे. जलसंधारणचे जे छोटे प्रकल्प आहेत त्यासाठी देखील भरीव निधीची तरतूद कऱण्यात आली आहे. याचा फायदा शेतकरी व नागरिकांना होणार आहे. तसेच रेवंडी ते रेडी जाणाऱ्या कोस्टल रोडसाठी देखील यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या वेगवेगळ्या विषयांसाठी निधीची तरतूद करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला झुकते माप दिल्याबद्दल कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.