कणकवली
डीपीसीसी तून कणकवली नगरपंचायत ला मिळालेला विकासनिधी हा स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार मिळाला आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर जोडीने त्याचे श्रेय घेऊन नये. उलट नगरपंचायत विकास आराखड्यातील 30 कोटी 64 लाख रुपयांचे परिपूर्ण प्रस्ताव अद्याप डीपीडिसी कडे प्रलंबित आहेत, त्यासाठी चा निधी मंजूर करून आणल्यास नाईक – पारकर जोडीचे जाहीर अभिनंदन करू असा टोला नगराध्यक समीर नलावडे यांनी लगावला.
भूमिगत विजवाहिनीसाठी रस्ता दुरुस्ती कामासाठी कणकवली नगरपंचायत ने 764 रु 14 पैसे प्रतिमिटर दर विजवीतरण कंपनीला दिला होता. मात्र 5 हजार प्रतिमिटर दर दिल्याने 6 कोटींचा निधी मागे गेल्याचे संदेश पारकर यांच्या आडून सांगणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी आपले अज्ञान उघडे केले असे सांगत नाईक-पारकर जोडीची जणू विकेटच नगराध्यक्ष नलावडे यांनी घेतली.
कणकवली शहरासाठी डीपीडिसी कडून मिळालेल्या विकासनिधी बाबत आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत संदेश पारकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून शिवसेनेने व्यक्त केलेला श्रेयवाद नलावडे यांनी खोडुन काढला. पारकर यांनी दलाल भवन ऐवजी विजय भवन मध्ये पत्रकार परिषद घेतल्याबद्दल अभिनंदन करतानाच पालकमंत्री सामंत आमचे जुने मित्र आहेत. त्यामुळे पारकर यांनी कणकवली च्या विकासनिधीची काळजी करू नये असा टोलाही नगराध्यक्ष नलावडे यांनी लगावला. यापुढे पारकर यांनी केवळ पत्रकार परिषद घ्याव्यात कारण तेवढेच काम त्यांना शिल्लक राहिले आहे, आम्ही शहरातील विकासकामांची भूमिपूजन आणि उदघाटने करणार.
नगरपंचायत कडे सध्या 1 लहान व 1 मोठा अग्निशामक बंब आहे.मात्र अग्निशामक यंत्रणा 15 वर्ष जुनी आहे. कणकवली शहराचे वाढते व्यापारीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पारकर यांनी सुसज्ज असा मोठा अग्निशामक बंब आणावा असा सल्लाही नलावडे यांनी दिला.शहरातील भूमिगत विजवाहिन्यांची लांबी 8 हजार 960 मीटर लांब होती. त्यासाठी रस्ते दुरुस्तीसाठी प्रतिमिटर 764 रु 14 पैसे दराने एकूण 68 लाख 46 हकार 750 रुपये विजवीतरण कंपनीकडे मागितले होते. तसे 29 मार्च 2020 आणि 20 फेब्रुवारी 2020 रोजीचे लेखीपत्रच नलावडे यांनी पत्रकार परिषदेत सादर करत आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर यांच्या प्रतिमिटर 5 हजार दराच्या आरोपातील हवाच काढून टाकली. वास्तवात नसलेला वाढीव दर सांगणाऱ्या नाईक आणि पारकर यांचेच काहीतरी भ्रष्टाचार करण्याचे साटेलोटे असेल म्हणूनच ठेकेदार कंपनीला नगरपंचायत ची भेट घेऊ दिली नसल्याचा आरोपही नलावडे यांनी केला.
आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर यांच्यामुळे भूमिगत विजवाहिणीचा 6 कोटींचा निधी मागे गेल्याची टीका नलावडे यांनी केली. केसरकर पालकमंत्री असताना तत्कालीन सावंतवाडी नगराध्यक्ष साळगावकर यांच्या काळात 2400 रु प्रतिमिटर रेट दिल्याने सावंतवाडी शहरासाठी आलेला 11 कोटींचा निधी मागे गेला. त्याबाबत आमदार वैभव नाईक का बोलत नाहीत ? असा सवाल करतानाच आमदार वैभव हे कणकवली नगरपंचायत ची नाहक बदनामी करताहेत. राज्यात नगरविकास खाते असलेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या आमदार वैभव यांनी कणकवली च्या विकासाची एवढीच कळकळ असल्यास नगरपंचायत ला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा. अतिरिक्त मुख्याधिकारी देऊन शिवसेना कणकवली नगरपंचायत वर सूड उगवत असल्याचा आरोप नलावडे यांनी केला.भालचंद्र महाराज सभामंडपसाठी नगरपंचायत चा 2 वेळ नाहरकत दाखला दिला.स्थानिकांचा असलेला विरोध मी स्वतः जाऊन चर्चा करून शांत केला असल्याचेही नलावडे यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभि मुसळे, गटनेता संजय कामतेकर, नगरसेवक बाबू गायकवाड, माजी नगरसेवक बंडू गांगण, महेश सावंत आदी उपस्थित होते.