*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*विठ्ठलाच्या पायी..*
विठ्ठलाच्या पायी ठेविली मी डोई
पालखीचे भोई कर देवा
नामाचे स्मरण नको विस्मरण
आशेचा किरण तूच देवा…
नाही केले पाप पुण्याई ती थोडी
भीमथडी घोडी यावी देवा
चरण, ते रज चंदन तो बुक्का
सोडीन न हेका चरणांचा..
करावी ती भक्ती मज नाही ठावे
नाम फक्त भावे घेई देवा
सावर तू मज मागणे एकच
तुझेच कवच मागते मी..
भक्तांचा तू दास हृदयी निवास
तरी आसपास शोधिती का?
शिणभाग देवा तुला अर्पियेला
वेडी म्हण मला सांभाळी बा..
विश्वाचा संसार चालविशी कसा
देतो पसा पसा सर्वकाळ
नमिते मी तुला मनात ठेवते
करतो गणिते विठू माझा…
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
