You are currently viewing ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांना देवगड तालुका पत्रकार समितीची भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांना देवगड तालुका पत्रकार समितीची भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांना देवगड तालुका पत्रकार समितीची भावपूर्ण श्रद्धांजली

शोकसभेत पत्रकारितेतील योगदानाला उजाळा; पत्रकारांच्या आरोग्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्याची घोषणा

देवगड

ज्येष्ठ पत्रकार तथा देवगड तालुका पत्रकार समितीचे उपाध्यक्ष दयानंद मांगले यांच्या निधनानिमित्त देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने आज शोकसभेचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शोकसभेत दिवंगत मांगले यांच्या पत्रकारितेतील योगदानाला उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद लोके, जिल्हा सदस्य प्रशांत वाडेकर, उपाध्यक्ष अनिल राणे, तालुका सचिव दिनेश साटम, सहसचिव सचिन लळीत, माजी अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, सदस्य सुरज कोयंडे, राजीव पडवळ, स्वप्निल लोके, नागेश दुखंडे, बंड्या ऊर्फ श्रीकृष्ण रानडे तसेच तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात उमेश तोरस्कर यांनी दयानंद मांगले यांच्या निधनामुळे पत्रकारितेत न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले. पत्रकारांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे नमूद करत सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने लवकरच पत्रकारांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
तालुकाध्यक्ष हेमंत कुलकर्णी यांनी संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेणारा सक्षम पदाधिकारी आपण गमावल्याची भावना व्यक्त केली. जिल्हा उपाध्यक्ष आनंद लोके यांनी मांगले हे अभ्यासू पत्रकार, उत्तम मित्र आणि अनेकांसाठी मार्गदर्शक होते, असे सांगितले. जिल्हा सदस्य प्रशांत वाडेकर यांनी त्यांच्या संयमी स्वभावाचा व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या वृत्तीचा गौरव केला. माजी अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांनी मांगले हे अजातशत्रू पत्रकार होते आणि त्यांच्या निधनाने पत्रकारितेची मोठी हानी झाल्याचे नमूद केले.
शेवटी उपस्थितांनी दिवंगत दयानंद मांगले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव दिनेश साटम यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा