सिंधुदुर्ग पर्यटनाला नवी दिशा; पर्यटन व्यावसायिकांसाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन होणार
कुणकेरीतील बैठकीत पर्यटन उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर यांची ग्वाही; होम स्टे, कृषी पर्यटन व ऑनलाईन मंजुरी प्रक्रियेवर भर
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या विविध समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नवीन पर्यटन धोरणे, शासनाच्या योजना आणि उपलब्ध सुविधांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी भविष्यात विशेष पर्यटन कार्यशाळा आयोजित करण्यात येतील, अशी ग्वाही कोकण विभागीय पर्यटन उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर यांनी दिली.
कुणकेरी (ता. सावंतवाडी) येथील सावंत फार्म ॲग्रो टुरिझम येथे सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्था, सावंतवाडी यांच्या वतीने आयोजित बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन विकास, पायाभूत सुविधा, व्यावसायिकांच्या अडचणी आणि नव्या पर्यटन प्रस्तावांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत निवास-न्याहारी (होम स्टे) योजना, कृषी पर्यटन केंद्रांना लागणाऱ्या परवानग्या, कर सवलती तसेच शासनाच्या विविध योजनांमधील अडचणींबाबत पर्यटन व्यावसायिकांनी थेट उपसंचालकांसमोर मांडणी केली. जास्तीत जास्त लाभार्थी असल्यास सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी एकत्रित मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येईल, असे डॉ. मनोहर यांनी स्पष्ट केले.
यावेळी ग्रामीण भागात वाढत असलेल्या होम स्टे आणि कृषी पर्यटन केंद्रांच्या प्रस्तावांना विहित कालावधीत मंजुरी मिळावी, जेणेकरून स्थानिक रोजगाराला चालना मिळेल, अशी मागणी सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावर डॉ. मनोहर यांनी सर्व प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन करत आवश्यक मार्गदर्शन केले.
“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू असून, प्रलंबित तसेच नव्या कायदेशीर प्रस्तावांना जलद गतीने मंजुरी मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल,” असा विश्वास डॉ. प्रज्ञा मनोहर यांनी व्यक्त केला.
या बैठकीस सह्याद्री कृषी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष शिवानंद शिरोडकर, उपाध्यक्ष प्रमोद सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा रविकांत सावंत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, पर्यटन उद्योजक, होम स्टे चालक, कृषी पर्यटन व्यावसायिक आणि जिल्ह्यातील पर्यटनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
होम स्टे आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गचा शाश्वत पर्यटन विकास साधण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
