*जागतिक साकव्य विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांची साकव्य स्पर्धेत उत्तेजनार्थ सन्मान प्राप्त काव्यरचना*
*’ सांग दर्पणा ‘*
न्याहाळते दर्पणी मी
सज्ज होऊनी साजिरी
ल्याली आभूषणे भारी
शालू माझा भरजरी ||
केला शृंगार देखणा
फिदा माझ्यावरती मी
सांग दर्पणा यामध्ये
काही नसे ना रे कमी ||
तूच खरा मित्र जगी
रूप अचूक दाखवी
उणे अधिक काहीही
ओळखाया तू शिकवी ||
ऐक दर्पणा एवढे
आठवाने मी लाजते
छबी नयनात त्याच्या
पाहण्याला आसुसते ||
त्याची चाहूल लागता
सुखावले मी अंतरी
लाज साखर मिठीची
उमटली गालावरी ||
नेत्र दर्पणी दोघांना
खूण पटे अंतरीची
सरे क्षणातच दूरी
साथ सात पावलांची ||
*ज्योत्स्ना तानवडे. पुणे*
