तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी मुंबईत शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घेतली भेट
सावंतवाडी :
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळांच्या छप्पराची अत्यंत दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी मुंबई येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन डेगवे येथील शाळांच्या छप्पर दुरुस्तीसाठी ‘खास बाब’ म्हणून तातडीने निधी मंजूर करण्याची आग्रही मागणी केली. या मागणीची तात्काळ दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना “तात्काळ कार्यवाही करावी” असे लिखित आदेश दिले.
नारायण राणे यांनी दिलेल्या निवेदनात डेगवे गावातील दोन जिल्हा परिषद शाळांची गंभीर अवस्था मांडली. मोयझरवाडी जि. प. शाळा क्र. २ चे छप्पर दोन दिवसांपूर्वी रात्री अचानक कोसळले. ही घटना रात्री घडल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर आंबेखणवाडी जि. प. शाळा क्र. ३ चे छप्परही पूर्णपणे मोडकळीस आले असून सध्या ते ताडपत्रीने झाकण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या दोन्ही शाळांमध्ये जुन्या लाकडी छप्पराऐवजी नवीन लोखंडी छप्पर उभारणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करत, दोन्ही शाळांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये इतका तातडीचा निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
मुंबईतील भेटीदरम्यान राणे यांनी परिस्थितीचे गांभीर्य शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पत्रावरच “मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग – तात्काळ कार्यवाही करावी” असा स्पष्ट शेरा मारला. त्यामुळे डेगवे येथील दोन्ही शाळांच्या छप्पर दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
