You are currently viewing झुंज

झुंज

महिला दिन विशेष

जून २०१३ साली मला तिसऱ्या पायरीचा शेवटचा टप्पा(third last stage breast cancer) ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. पहिले चार तासाचे मोठे ऑपरेशन झाले. त्यात स्तनाची पुर्ण डावी बाजू आणि डाव्या हाताच्या पंधरा नसा कापल्या. एवढा कॅन्सर पसरला होता. त्यात मुलाच्या दहावीचे वर्ष शाळेचा पहिला दिवस आणि माझ्या आॕपरेशनचा दिवस एकच. घरात सगळेजण घाबरले होते .कारण तीन डॉक्टरांनी सहा महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही असे सांगितले . ऑपरेशन नंतर सहा केमोज आणि केमोज नंतर १८ हरसेप्टीन इंजेक्शन जी केमोज सारखीच घ्यावी लागतात, ते घ्यायचे होते. त्याची किंमत प्रत्येकी एक लाख दहा हजार पर्यंत होती.आणि रेडियेशन पण घ्यायचे होते, त्याच बरोबर सर्व वैद्यकिय चाचण्या ,वेगवेगळे इंजेक्शनस ,खूप खर्च होत होता.
आतापर्यंत ऑपरेशन आणि औषधांचा खर्च आठ लाख झाला होता आणि अजून एक छोटस ऑपरेशन बाकी होत. खर्चाचा डोंगर वाढत होता. मी शारीरिक आणि मानसिक कशी झुंज देणार, ह्या आजारावर ह्याची शाश्वती नव्हती.
अतिशय खडतर प्रवास सुरू झाला . केमोजला हिंदुजा हॉस्पिटल ला गेले .पहिली केमो सुरू झाली बाजूच्या रूममधून एका बाईचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मी घाबरून गेले माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली. आता आपलं पण असंच काहीसं होणार .आपण कसे वागणार यानंतर. कारण खूप काही ऐकलं होतं कॕन्सर बद्दल. पण, आता स्वतःलाच झाल्याने प्रत्यक्षात अनुभवत होते. दुसऱ्या केमो नंतर माझ्या डोक्यावरचे केस जायला लागले. आता आपल्याला टक्कल पडणार .आधी शरीराचा एक भाग कापला गेला, आता डोक्यावरचे केसही जाणार .माझा मुलगा माझा नवरा, घरातले आपल्याशी कसे वागणार आपल्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असणार, सगळे प्रश्न मनाला भेडसावू लागले. त्यात कोणाची सहानुभूती दाखवलेली सुद्धा आवडत नव्हती. मुलगासुद्धा चिडायचा म्हणायचा माझ्या दहावीच्या वेळेला तुला असा कसा त्रास झाला. मी सर्व बाजूने हतबल झाले होते त्यात मध्यमवर्गीय म्हटल्या नंतर वर आर्थिक प्रश्न सुद्धा घरात भेडसावत होते. दर वेळेला केमो आधीच्या रक्त तपासण्या तेव्हा हाताला लागणाऱ्या सुया नंतर लागणाऱ्या सुया आणि आता एकच उजवा हात त्यावर सर्व होणारे प्रयोग सर्व छिन्नविच्छिन्न होताना दिसत होतं .मृत्यूनंतरच्या नरक यातना ह्या पेक्षा भयावह काही असू शकत नाही असे मला वाटले.
मला कळतच नव्हतं जगाव की मराव .माझे वडील डॉक्टर असल्याने त्यांनी मला समजावल. परंतु आधी तेही ,आणि माझ्या घरचे सर्वच खूप घाबरले होते. पेशंटला समजवणे आणि पोटच्या मुलीला समजवणे ह्यात फरक असतो ,हे तेव्हा त्यांना कळले. सर्वांना भिती होती ही कसं काय सर्व सहन करेल? कारण तोपर्यंत मला कधीही कुठल्या डॉक्टर कडे डिलेवरी शिवाय हॉस्पिटल मध्ये जायची वेळ आली नव्हती. सर्वच भयावहं होतं.
माझा गणपती आणि गजानन महाराजांवर श्रद्धा आणि विश्वास असल्याने प्रत्येक केमोला अथर्वशीर्ष ,रामरक्षा, मारुती स्तोत्र ऐकायचे. लहान मुलं जशी गोड औषध घेत आहे तसेच हे औषध माझ्या शरीरात जात आहे माझ्या वाईट पेशीं बरोबर चांगल्या पेशी ही मरत होत्या, त्या परत चांगल्या तयार होणार आहेत .अशी ,खात्री मी बाळगत होते .मला जो जे सांगेल ते सर्व मी करत होते. वेगवेगळ्या यातनांनी शरीर एकीकडे खंगत होते आणि मुलाच्या काळजीने मी झुरत ही होते.
*पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण* *मारी* असं काहीस झालं, माझ्याबाबतीत. अध्यात्मिक वाचनाने चिंतनाने, नामस्मरणाने ,सकारात्मकता उजागर झाली. मुलाच्या दहावीत प्रिलीमला त्याला ६०% होते शेवटचे दोन महिने अभ्यास करून घेतला आणि त्याला ८३% टक्के मिळाले. घरात आनंद झाला .माझ्या आजारपणा चा मी त्याच्या अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही. पावणे दोन वर्ष हॉस्पिटलमध्ये चांगले-वाईट अनुभव आले. सर्व दिव्यत्व पार केले . माझ्या आजारावर ४५ लाख रुपये खर्च झाला. डॉक्टरही म्हणाले माझ्या पंचवीस वर्षात अशी केस मी पाहिली नाही. मला या प्रवासात माझ्या आप्तस्वकीय आणि माझ्या मैत्रिणींनी खूप साथ दिली. माझे वडील डाॕक्टर आहेत त्यांनी कॕन्सर वर संशोधन केले आहे .मला त्यांची ट्रीटमेंट चालू आहे .त्यामुळेच मी जिवंत आहे.देवा नंतर कोण असतील तर ते माझे वडील.आता आयुष्याचा क्षण अन् क्षण जगण्याचा प्रयत्न करत आहे औषधांचे side effects अजूनही सहन करते आहे ते ही आनंदाने. परमेश्वराकडे एकच प्रार्थना, आता ,कधीही हॉस्पिटलच तोंड बघायला मिळू नये. कुठल्याही डॉक्टरचा स्पर्श नको .नकळतच तुझं बोलावन यावं आणि हसतमुखाने मी सामोरे जावे .माझ्या आयुष्यातली अशी ही खडतर

झुंज

वाईटातून चांगले घडते असं सर्वांबरोबर होत नाही आनंदी जगण्याचे गुपीत उमगले सर्वांनाच ते उमगत नाही

झुंज असते प्रत्येकाची आगळी
दिव्यत्व करावे लागते पार
मृत्यूचे ही बघावे लागते द्वार
तेव्हाच जीवनाचा कळतो सार

सौ.मानिनी महाजन
मुलुंड ,मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा