सचिन वालावलकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
गंभीर आजारांवरील मोफत व सवलतीच्या शस्त्रक्रिया; २१-२२ जुलैला डेरवण येथे बाल शस्त्रक्रिया विशेष कॅम्प
वेंगुर्ले :
शिवसेना नेते, माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार, १८ जुलै रोजी वेंगुर्ले येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या शिबिराचा शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले.
वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत वालावलकर यांनी ही माहिती दिली. हे शिबिर वेंगुर्ले तालुका शिवसेना, सचिन वालावलकर मित्रमंडळ, भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर हॉस्पिटल (डेरवण) आणि उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे. बी. चौगुले, डेरवण हॉस्पिटलचे डॉ. सचिन धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र लिलके, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्यासह अनेक पदाधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे विविध गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया मोफत तसेच काही शस्त्रक्रिया अत्यंत अल्प दरात केल्या जाणार आहेत. शासकीय योजनांच्या माध्यमातून अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोग शस्त्रक्रिया, पित्ताशयातील खडे, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया, मुतखडा आणि मोतीबिंदू यांसारख्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
तसेच हर्निया, महिलांचे गर्भाशयाचे आजार, थायरॉईड, मणक्याची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, अपेंडिक्स, मूळव्याध आणि स्तनांमधील गाठींवरील उपचार अत्यल्प दरात केले जाणार आहेत. शिबिरात जनरल सर्जन, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग आणि नेत्ररोग तज्ज्ञांसह विविध विभागांचे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत.
याशिवाय मुंबईतील प्रख्यात बाल शल्यचिकित्सक डॉ. पारस कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ व २२ जुलै रोजी डेरवण येथील रुग्णालयात विशेष बाल शस्त्रक्रिया कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. या विशेष कॅम्पसाठीची नोंदणीदेखील १८ जुलैच्या शिबिरातच केली जाणार आहे.
नोंदणी केलेल्या रुग्णांना डेरवण येथे ने-आण करण्याची मोफत व्यवस्था करण्यात येणार असून, संबंधित आजारांवरील शस्त्रक्रियाही मोफत केली जाणार असल्याची माहिती सचिन वालावलकर यांनी दिली. पत्रकार परिषदेत डॉ. धुमाळे आणि डॉ. चौगुले यांनीही या शिबिराचे महत्त्व विशद करत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
