‘ऑपरेशन अभ्यास’अंतर्गत 260 नागरी संरक्षण स्वयंसेवकांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, सिंधुदुर्ग यांच्या वतीने केंद्रीय गृह मंत्रालय व राज्य गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन सिंदूर’ पश्चात ‘ऑपरेशन अभ्यास’ या उपक्रमांतर्गत नागरी संरक्षण दलाच्या 360 स्वयंसेवकांना क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या स्वयंसेवकांना आज प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम आरमार प्रमुख मायनाक भंडारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह या ठिकाणी संपन्न झाला आहे. त्यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत सिंधुदुर्ग हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, युध्दाच्या वेळेस सीमेवर आर्मी नेव्ही ऐअर फोर्स हे देशरक्षणाचे कर्तव्य बजावत असतात. परंतु, प्रत्यक्ष नागरीकांमध्ये युध्दाच्या परिस्थितीमध्ये नागरी संरक्षण दलाची भुमिका ही फार महत्वाची असते. याच धर्तीवर ले. कर्नल प्रशांत चतुर (नि.) उपनियंत्रक, नागरी संरक्षण सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात आले असुन प्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थीनी आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करावा. तसेच जास्तीत जास्त नागरीकांना याबाबतचे प्रशिक्षण/प्रबोधन देण्यात यावे असेही सांगितले.
