PM-YASASVI ‘टॉप क्लास एज्युकेशन’ शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
इयत्ता 9 वी ते 11 वी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता “Top Class Education in School for OBC, EBC & DNT Students” ही शिष्यवृत्ती योजना सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी राबविण्यात येत असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील OBC, EBC व DNT प्रवर्गातील इयत्ता 9 वी ते 11 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांनी https://scholarships.gov.in या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर जाऊन प्रथम New Registration करून नोंदणी करावी. त्यानंतर प्राप्त झालेल्या Application ID आणि पासवर्डच्या आधारे Fresh Login (AY 2026-27) मधून लॉगिन करून PM-YASASVI – Top Class School Education for OBC/EBC/DNT Students ही योजना निवडून अर्ज भरावा. अर्जामध्ये वैयक्तिक, शैक्षणिक माहिती, बँक खात्याची माहिती, ओबीसी जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, गुणपत्रिका इत्यादी माहिती व्यवस्थित भरावी.
अर्जासोबत जात प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत), मागील इयत्तेची गुणपत्रिका, शाळेचा दाखला अथवा अध्ययन प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो PDF किंवा JPEG स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व माहिती अचूक भरल्यानंतरच Final Submit करावे. अंतिम सादरीकरणानंतर अर्जामध्ये बदल करता येत नसल्याने विद्यार्थ्यांनी सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत.
विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर संबंधित शाळेच्या Institute Nodal Officer (INO) मार्फत अर्जाची ऑनलाइन पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला याबाबत माहिती देणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया 1 जून 2026 पासून सुरू झाली असून 31 ऑक्टोबर 2026 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. अर्जातील त्रुटी दुरुस्ती व संस्थास्तरावरील पडताळणी १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत, तर जिल्हा, राज्य व मंत्रालय स्तरावरील पडताळणी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे.
अर्ज करताना विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी कार्यरत असावा. तसेच अर्जातील नाव व इतर तपशील आधार कार्ड आणि बँक खात्यातील माहितीनुसारच भरावेत. चुकीची माहिती दिल्यास अर्ज नामंजूर होऊ शकतो. अर्ज सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी नियमितपणे NSP पोर्टलवरील अर्जाची स्थिती तपासावी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील OBC, EBC व DNT प्रवर्गातील एकही पात्र विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये तसेच अधिक माहितीसाठी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा इतर मागास बहुजन कल्याण विभागाशी संपर्क साधावा.
