You are currently viewing मालोंड- मालडी बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी लागणारा अधिकचा निधी आणू….

मालोंड- मालडी बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी लागणारा अधिकचा निधी आणू….

पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

मालवण

मालोंड- मालडी बंधाऱ्याचे रद्द झालेले काम पुन्हा मंजूर करून घेण्यात आले. या बंधाऱ्याचे काम चांगल्या दर्जाचे होणे गरजेचे असून त्यासाठी स्थानिकांना विश्वासात घेण्यात यावे. याचबरोबर या बंधाऱ्याची उंची वाढविण्याची जी स्थानिकांची मागणी आहे, त्यादृष्टीने लागणारा अधिकचा निधी आणण्याची आपली जबाबदारी असून ती निश्चितच पार पाडली जाईल अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी मालडी येथे दिली. मालोंड-मालडी येथील कोल्हापूर बंधारा पाटबंधारे योजनेचे भूमीपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, बबन शिंदे, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, संग्राम प्रभूगावकर, छोटू ठाकूर, प्रसाद मोरजकर, अमित भोगले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, नागेंद्र परब, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, संदीप हडकर, प्रांत वंदना खरमाळे, मालडी सरपंच संदीप आडवलकर, मालोंड सरपंच वैशाली घाडीगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, लोकांनी मागणी केलेली कामे पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे. मालडी बंधाऱ्याची गेली २५ वर्षे मागणी करण्यात येत होती. अखेर हे काम आता मार्गी लागत आहे. यात या बंधाऱ्याची उंची वाढविल्यास त्याचा पंचक्रोशीस लाभ होईल अशी मागणी यावेळी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मालडी बंधाऱ्याचे काम।मंजूर होण्यासाठी संग्राम प्रभुगावकर आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी केलेला पाठपुरावा महत्वपूर्ण ठरला आहे. लोकांनी मागणी केलेली कामे पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे. बंधाऱ्याची उंची वाढल्यास लागणारा अधिकचा निधी आणण्याची जबाबदारी माझी तसेच खासदार, आमदार यांची आहे, असेही पालकमंत्री सामंत म्हणाले.

तर खासदार विनायक राऊत म्हणाले, या बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न राहतील. वाढीव काम करण्याच्या दृष्टीकोनातून या बंधाऱ्याचे काम केले जाईल. मालडीचा या बंधाऱ्याचे पाणी आजूबाजूच्या पाच गावांना मिळणार आहे. हा बंधारा पंचक्रोशीसाठी जीवनदायी, लाभदायी ठरेल, असेही खास. राऊत म्हणाले. गतवर्षी आंगणेवाडी यात्रेत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मसुरे देऊळवाडा येथील धरण तसेच मालडी बंधाऱ्याचे काम मार्गी लावले जाईल असे वचन दिले होते. यात्रेच्या दिवशी या कामांचे भूमीपूजन करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या वचनाची पूर्ती केली आहे, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा