You are currently viewing गोमांससदृश्य मांसाने भरलेली इर्टिगा पलटी; चालक ताब्यात

गोमांससदृश्य मांसाने भरलेली इर्टिगा पलटी; चालक ताब्यात

गोमांससदृश्य मांसाने भरलेली इर्टिगा पलटी; चालक ताब्यात

नेमळे फौजदारवाडी येथे अपघातानंतर पळण्याचा प्रयत्न फसला; ४०० ते ५०० किलो मांस जप्त, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

सावंतवाडी :

मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील नेमळे फौजदारवाडी येथे गोमांससदृश्य मांसाची वाहतूक करणारी इर्टिगा कार शुक्रवारी (दि. १०) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुभाजकाला धडकून पलटी झाली. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला स्थानिक नागरिक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कारमधून सुमारे ४०० ते ५०० किलो गोमांससदृश्य मांस जप्त करण्यात आले असून, पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी सद्दाम दलावसाब यलवट्टी (वय ३१, रा. यंगणवाडी नगर, पेडणे-गोवा, सध्या रा. कलंगुट-गोवा, मूळ रा. हुबळी, कर्नाटक) याला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित इर्टिगा कार कर्नाटकातील अभय नावाच्या व्यक्तीच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चालक निपाणी-राधानगरी मार्गे गोव्याच्या दिशेने इर्टिगा कारमधून गोमांससदृश्य ४०० ते ५०० किलो मांस घेऊन जात होता. झाराप-पत्रादेवी बायपासवर कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट दुभाजकावर आदळले आणि रस्त्याच्या पलीकडे जाऊन पलटी झाले. अपघाताच्या धडकेत कारमधील मांस रस्त्यावर विखुरले.
अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयित चालकाला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस हवालदार दीपक शिंदे, मनोज राऊत, अनिल धुरी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त कारसह मांस जप्त करण्यात आले असून, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा