मुणगे मारहाण प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा देवगड पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा
ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल असूनही कारवाईला विलंब झाल्याचा आरोप; पीडितावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचाही दावा
कणकवली :
मुणगे येथे बौद्ध समाजातील तरुण रोहित नारायण कदम याला जात विचारून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याच्या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप अनुसूचित जाती समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला. या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा देवगड पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, देवगड तालुका सेवा संघाचे पदाधिकारी आनंद देवगडकर, माजी नगरसेवक गौतम खोडकर यांच्यासह समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.
अंकुश जाधव यांनी सांगितले की, कुडाळ तालुक्यातील कसाल येथील रोहित नारायण कदम हा तरुण मुणगे येथे बॅनर लावण्याचे काम करत असताना काही जणांनी त्याला अडवून त्याची जात विचारली. जात समजल्यानंतर त्याच्याशी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तसेच “तुम्ही खालच्या जातीचे लोक अशीच कामे करणार” अशा शब्दांत त्याचा अपमान करून काम न करण्यासाठी दमदाटी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
या घटनेनंतर पीडित कदम कुटुंब भीतीच्या छायेत असून, रोजगारासाठी बॅनर लावण्याचे काम करण्यासही घाबरत असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी अद्याप अटकेबाहेर असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे जाधव म्हणाले. तसेच पीडित कुटुंबावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
आरोपी कोणत्याही जाती, पक्ष किंवा संघटनेचे असले तरी कायदा सर्वांसाठी समान असून, तपासाची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही अटक का होत नाही, याचे स्पष्टीकरण पोलीस प्रशासनाने द्यावे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार असून, मागणी मान्य न झाल्यास देवगड पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान, पीडित रोहित कदम यानेही पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडत, कामावर असताना काही जणांनी नाव व जात विचारून जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली तसेच मोबाईलची तोडफोड केल्याचा आरोप केला.
